महत्वाच्या बातम्या

 आरमोरी पोलिसांच्या तक्रार निवारण दिनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


- जमीनविषयक वाद, कौटुंबिक भांडणे यांसह विविध तक्रारींचे प्रत्यक्ष ऐकून निराकरण; नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक एम. रमेश  सा. यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी ३ ऑक्टोबर रोजीपोलीस ठाण्याच्या परिसरात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ ते २ या वेळेत झालेल्या या उपक्रमाला आरमोरी पोलीस ठाणे हद्दीतील विविध गावांमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या समस्या व तक्रारी पोलिसांसमोर मांडल्या. जमीनविषयक वाद, आपापसांतील भांडणे तसेच अन्य विविध स्वरूपाच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी मांडल्या.

तक्रार निवारण दिनाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे (IPS) होते. यावेळी आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन झनक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे, पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे, पोलीस उपनिरीक्षक तळोले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी उपस्थित नागरिकांच्या तक्रारी व अडचणी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. प्रत्येक तक्रारीचे स्वरूप समजून घेत संबंधित नागरिकांना आवश्यक ते कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. काही तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले, तर आवश्यक असलेल्या प्रकरणांमध्ये तक्रारींची नोंद घेऊन नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांनी सांगितले की, नागरिकांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेणे आणि त्यांचे कायदेशीर पद्धतीने निराकरण करणे ही पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन पोलिसांकडे निःसंकोचपणे यावे. कोणत्याही वादाचे रूपांतर मोठ्या गुन्ह्यात होण्यापूर्वी कायदेशीर मार्गाने त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे. नागरिकांनीही कायदा हातात न घेता पोलिसांशी समन्वय साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

तक्रार निवारण दिनामुळे पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या समस्या थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडता आल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. तक्रारींचे स्वरूप समजून घेत संबंधितांना कायदेशीर प्रक्रिया, उपलब्ध उपाययोजना आणि पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमाला आरमोरी पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गावांमधून नागरिक उपस्थित होते. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेत त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली. त्यामुळे तक्रार निवारण दिन नागरिक आणि पोलीस प्रशासनातील संवाद, समन्वय व विश्वासअधिक दृढ करणारा ठरला.नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने, पारदर्शकपणे आणि नियमानुसार निराकरण करण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी दिसून आले. आरमोरी पोलिसांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला तक्रार निवारण दिन यशस्वीरीत्या पार पडला.





  Print






Related Photos