नवरात्रीत बल्लारपूर पोलिसांची सलग तिसरी कारवाई : दारूच्या नशेत तलवार घेऊन दहशत निर्माण करणारा तरुण ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नवरात्रोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गस्त घालणाऱ्या बल्लारपूर पोलिसांनी सलग तिसरी कारवाई केली. बालाजी वार्डात दारूच्या नशेत हातात धारदार तलवार बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून अजित स्वयंवरसिंग ठाकूर (वय २७), रा. बी.टी.एस. प्लॉट, शिवाजी वार्ड, बल्लारपूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.
१५ ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक उमेश दिगंबर जोगदंड हे पोलीस पथकासह नवरात्रोत्सवानिमित्त गस्त घालत असताना त्यांना संबंधित तरुणाबाबत गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे पथक दिसताच संशयिताने हातातील तलवार बाजूला फेकून दिली. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तलवार जप्त केली.
या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८५(१) अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, पोअं महेश कुकुडकर, शांतकुमार घोसे, संदीप थेरे यांनी केले.




Petrol Price




