महत्वाच्या बातम्या

 नागपूरकरांना श्रावणसरींचा सुखद गारवा : तापमानात ८ अंशांची घसरण


- दिवसभर रिमझिम सरींची हजेरी; १६.९ मिमी पावसाची नोंद, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना शनिवारी झालेल्या पावसाने सुखद दिलासा दिला. पहाटेपासूनच आकाश ढगांनी भरून आले होते. सकाळी रिमझिम सरींनी सुरुवात केल्यानंतर दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत राहिल्या. पावसाचा जोर फारसा नसला तरी सरींमुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.

शनिवारी पहाटे ५ वाजल्यापासून शहरातील बहुतांश भागांत पावसाच्या सरी सुरू झाल्या. सकाळच्या सत्रात काही भागांत पावसाचा जोर तुलनेने अधिक जाणवला. त्यानंतर मात्र दिवसभर हलक्या सरींचा क्रम सुरू राहिला. अधूनमधून पावसाने हजेरी लावल्याने शहरातील काही सखल भागांमध्ये तसेच रस्त्यांवर पाणी साचले. मात्र, पावसाचा जोर कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.

तापमानात तब्बल ८ अंशांची घट -
पावसामुळे नागपूरच्या तापमानात लक्षणीय घट झाली. दिवसाचे तापमान तब्बल ८ अंशांनी घसरून २५.६ अंश सेल्सिअसवर आले. त्यामुळे दिवसभर वातावरण आल्हाददायक राहिले. अनेक दिवसांपासून उकाडा आणि उष्णतेचा सामना करणाऱ्या नागपूरकरांना तापमानातील या घसरणीमुळे काहीसा दिलासा मिळाला.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार, शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ६.९ मिमी पाऊस झाला. त्यानंतर सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत आणखी १० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे दिवसभरात नागपुरात एकूण १६.९ मिमी पाऊस पडला.

दिवस-रात्रीच्या तापमानात अवघा ३.२ अंशांचा फरक -
शनिवारी रात्रीचे तापमान २२.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसाचे कमाल तापमान २५.६ अंश आणि रात्रीचे तापमान २२.४ अंश असल्याने दिवस आणि रात्रीच्या तापमानात अवघा ३.२ अंश सेल्सिअसचा फरक राहिला. त्यामुळे रात्रीच्या वातावरणातही गारवा जाणवत होता.

हवेत ९६ टक्के आर्द्रता -
पावसासोबतच वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. सकाळी आणि सायंकाळी हवेतील आर्द्रता तब्बल ९६ टक्के नोंदविण्यात आली. त्यामुळे हवेत गारवा असला तरी दमटपणाही जाणवत होता. अनेक दिवसांनंतर शहरात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. श्रावणातील सरींमुळे शहराचे वातावरणही काही काळ प्रसन्न झाले. पावसाच्या या हजेरीने नागपूरकरांची पावसाची प्रतीक्षा काही अंशी संपली असून, आगामी दिवसांत आणखी चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





  Print






Related Photos