चितळाच्या शिकारी प्रकरणी दोघांना अटक : वनविभागाची धडक कारवाई


- गांधीनगर-कोपरल्ली परिसरातील घटना; मार्कंडा वनपरिक्षेत्रात वनगुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आष्टी : आलापल्ली वनविभागांतर्गत येणाऱ्या मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्रातील गांधीनगर-कोपरल्ली परिसरात चितळाची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाच्या पथकाने धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई १० ऑक्टोबर रोजी करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्रातील रेंगेवाही उपक्षेत्र आणि कोपरल्ली नियतक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गांधीनगर-कोपरल्ली परिसरात वन्यप्राण्याची शिकार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणाची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने कारवाई केली.तपासादरम्यान रामानंद कृष्णपव शिल आणि तपन प्रसाद पंजा (दोघेही रा. गांधीनगर, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
वन्यजीवांच्या शिकारीला प्रतिबंध घालण्यासाठी वनविभागाकडून परिसरात लक्ष ठेवले जात असून, वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात आहे. चितळासारख्या वन्यप्राण्यांची शिकार ही वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जाते. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला असून, शिकारीच्या घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास केला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
ही कारवाई उपवनसंरक्षक शैलेश मीना आणि सहायक वनसंरक्षक मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एम. मोढळे, रेंगेवाही क्षेत्र सहायक व्ही. धात्रक, कोपरल्ली नियतक्षेत्राचे वनरक्षक एस. हजारे आणि मल्लेरा नियतक्षेत्राचे वनरक्षक डी. दुर्गमवार यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एम. मोढळे करीत आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाकडून अशा घटनांवर लक्ष ठेवले जात असून, शिकारीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे.




Petrol Price




