अफगाणिस्तानचा शेवटचा बुर्ज ढासळला : तालिबान काबुलमध्ये दाखल


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / काबुल :
तालिबान दहशतवादी संघटनेनं आतापर्यंत अफगाणिस्तानातील सर्व प्रमुख शहरांवर आपला ताबा घेतला आहे. यानंतर आता तालिबानी बंडखोर राजधानी काबूलमध्येही दाखल झाले आहेत. येत्या दोन तासांत काबूलही काबीज करू असा दावा तालिबानच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तालिबान संघटनेचे हल्लेखोर काबूल शहरात दाखल झाल्याची झाल्याची पुष्टी एएफपी वृत्तसंस्थेनं स्थानिक लोकांच्या हवाल्यानं केली आहे. याआधी, अफगाणिस्तानचे एक खासदार आणि तालिबाननं म्हटलं होतं की अतिरेक्यांनी काबूलपासून पश्चिमेकडे काही अंतरावर असणाऱ्या एका प्रांताच्या राजधानीवर ताबा मिळवला आहे. काबूल शहरातील नागरिक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे अफगाण सरकारने हे शहर आमच्या ताब्यात द्यावे. आम्हाला याठिकाणी हिंसाचार करायचा नाही. आम्ही अफगाण सरकारच्या घोषणेची वाट पाहणार आहोत.
तत्पूर्वी, पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी सांगितले की, तालिबाननं तोरखम सीमेवर नियंत्रण मिळवले आहे. याबाबत माहिती देताना शेख रशीद अहमद यांनी स्थानिक ब्रॉडकास्टर जिओ टीव्हीला सांगितलं की, पाकिस्ताननं सीमापार होणारी वाहतूक बंद केली आहे. तोखरम ही अफगाण सरकारच्या नियंत्रणाखालील शेवटचे ठिकाण होते. तालिबानी बंडखोर अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने पुढे येत असताना काबूलमधील अमेरिकन दूतावासाबाहेर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. याठिकाणी अमेरिकेचे अनेक हेलिकॉप्टर उतरवले जात आहेत. त्याचबरोबर अमेरिकन अधिकाऱ्यांनी संवेदनशील कागदपत्रे मिटवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दूतावास परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले होते.  Print


News - World | Posted : 2021-08-15
Related Photos