महत्वाच्या बातम्या

 ऑपरेशन यू-टर्न : अपघातांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांची विशेष मोहीम


- शॉर्टकटच्या नादात जीव धोक्यात घालू नका; निर्धारित यू-टर्नच वापरा, वाहतूक विभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच काही वाहनचालकांकडून निर्धारित यू-टर्नचा वापर न करता विरुद्ध दिशेने वाहन चालविले जात असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखून अपघातांना आळा घालण्यासाठी गडचिरोली शहर वाहतूक विभागाकडून ऑपरेशन यू-टर्न ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच वाहतूक नियमांच्या पालनाबाबत जनजागृती केली जात आहे. शॉर्टकटच्या नादात रॉंग साइड नको; सुरक्षित प्रवासासाठी निर्धारित यू-टर्नच हवा, असा संदेश वाहतूक विभागाकडून वाहनचालकांना देण्यात येत आहे.

काही मिनिटांचा शॉर्टकट ठरू शकतो जीवघेणा -
शहरातील प्रमुख रस्ते तसेच महामार्गांवर वाहनचालकांना सुरक्षितपणे दुसऱ्या दिशेने जाता यावे, यासाठी विविध ठिकाणी नियोजित यू-टर्नची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, काही वाहनचालक वेळ वाचविण्याच्या प्रयत्नात निर्धारित यू-टर्नपर्यंत जाणे टाळतात आणि विरुद्ध दिशेने वाहन चालवितात.

काही मिनिटांचा वेळ वाचविण्यासाठी घेतलेला हा शॉर्टकट अनेकदा जीवघेणा ठरू शकतो. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकाला अचानक ब्रेक लावावा लागू शकतो किंवा वाहन बाजूला वळवावे लागू शकते. त्यामुळे वाहनांचा तोल जाऊन धडक होण्याची शक्यता वाढते. विशेषतः गर्दीच्या वेळेत रॉंग साइडने वाहन चालविल्यामुळे वाहतुकीचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत होतो. परिणामी इतर वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढतो.

नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची नजर -
ऑपरेशन यू-टर्न अंतर्गत विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे. नियमभंग रोखण्याबरोबरच शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यावर पोलिसांचा भर आहे.

कारवाईसोबत जनजागृतीवरही भर -
ही मोहीम केवळ दंडात्मक कारवाईपुरती मर्यादित न ठेवता वाहनचालकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला आहे. शहरातील विविध ठिकाणी वाहनचालकांना थांबवून निर्धारित दिशेनेच वाहन चालविणे, नियोजित यू-टर्नचा वापर करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत.

निर्धारित यू-टर्नचा वापर करण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ हा स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे वाहनचालकांनी काही मिनिटे वाचविण्यासाठी रॉंग साइडने वाहन चालवून स्वतःचा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

हेल्मेट, सुरक्षित वेग आणि इतरांच्या सुरक्षेचे भान ठेवा -
ऑपरेशन यू-टर्नच्या माध्यमातून दुचाकीस्वारांनी अनिवार्यपणे हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहनचालकांनी सुरक्षित वेग राखावा, तसेच वाहन चालविताना स्वतःच्या सुरक्षेसोबत रस्त्यावरील इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक नियम हे केवळ कारवाईपासून बचाव करण्यासाठी नसून अपघात टाळण्यासाठी आणि प्रत्येकाचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहतूक शिस्त राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन गडचिरोली शहर वाहतूक विभागाने केले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम -
ऑपरेशन यू-टर्न ही मोहीम पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. शहर वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सपोनि. शरद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक विभागाचे कर्मचारी मोहिमेची अंमलबजावणी करीत आहेत.





  Print






Related Photos