शेअर बाजारातील मोठ्या परताव्याच्या आमिषाने ९ लाख ९० हजारांचा गंडा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेअर बाजारात मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून डब्ल्यूसीएल कर्मचाऱ्याची तब्बल ९ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुंतवणुकीवर तब्बल ७९ लाख ५९ हजार ४७० रुपये नफा झाल्याचे अँप वर दाखविण्यात आले. मात्र नफा तर मिळालाच नाही, उलट गुंतविलेली मूळ रक्कमही काढता न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी चंद्रपूर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
केशव रामदास पिंपळकर ५३ वर्षे हे डब्ल्यूसीएलच्या लालपेठ, चंद्रपूर येथील आस्थापनेत फोरमन पदावर कार्यरत आहेत. त्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीची काहीशी माहिती असल्याने ते यापूर्वीही गुंतवणूक करीत होते. २० ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना फेसबुकवर शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्याची जाहिरात दिसली. या जाहिरातीच्या माध्यमातून ते ‘सस्क्वेहॅना’ नावाच्या व्हॉट्सअॅप समूहात सहभागी झाले.
या समूहात अनेक सदस्य असल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर शिखा शर्मा या नावाने पिंपळकर यांना वैयक्तिक संदेश पाठविण्यास सुरुवात झाली. भारताची अर्थव्यवस्था चांगली राहणार असून सध्या गुंतवणुकीसाठी योग्य वेळ असल्याचे सांगण्यात आले. ऑनलाइन व्हॉट्सअॅप वर्गाच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याचे सांगून त्यांना वारंवार गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.
समूहातील इतर गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाल्याचे दाखविण्यात आल्याने पिंपळकर यांचा विश्वास बसला. ३० ऑगस्ट रोजी त्यांनी सुरुवातीला १० हजार रुपये गुंतविले. त्यावर अॅपमध्ये १ हजार १०० रुपये नफा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे व्यवहार खरा असल्याचा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यानंतर समूहातून मिळणाऱ्या सूचनांनुसार त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांत मोठ्या रकमा गुंतवण्यास सुरुवात केली.
३० ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पिंपळकर यांनी एकूण ११ व्यवहारांतून ९ लाख ९० हजार रुपये ऑनलाइन हस्तांतरित केले. सुरुवातीला १० हजार रुपयांपासून सुरू झालेली गुंतवणूक पुढे ५० हजार, ८० हजार, १ लाख, १ लाख ४० हजार आणि अखेरीस ४ लाख रुपये अशा टप्प्यांत वाढली. संबंधितांनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली.
गुंतवणुकीनंतर संबंधित अॅपवर त्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात नफा जमा झाल्याचे दाखविण्यात आले. तब्बल ७९ लाख ५९ हजार ४७० रुपये नफा झाल्याचे दिसत होते. मात्र हा नफा काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे मिळाले नाहीत. एवढेच नव्हे तर पिंपळकर यांनी गुंतविलेली मूळ ९ लाख ९० हजार रुपयांची रक्कमही परत काढता येत नव्हती.
यानंतरअॅपवर २३ लाख ५२९ रुपये ८१ पैसे थकीत कर्जाची रक्कम असल्याचा संदेश दाखविण्यात आला. ही रक्कम भरल्यानंतर १ कोटी २ लाख ६३ हजार ३८५ रुपये ८० पैसे किमतीच्या शेअर्सचे मालक होता येईल आणि त्यातून तब्बल ४ कोटी १ लाख ५० हजार ८०० रुपयांचा फायदा मिळेल, असे भासविण्यात आले.
याबाबत पिंपळकर यांनी शिखा शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी थकीत रक्कम भरल्याशिवाय शेअर्स विकता येणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच क्रेडिटवर परिणाम होण्याची भीती दाखवून लवकरात लवकर पैसे भरण्याचा दबाव आणण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. एवढी मोठी रक्कम उभी करणे शक्य नसल्याचे पिंपळकर यांनी सांगितल्यानंतर कर्ज काढण्याचा, सात दिवसांची मुदत घेण्याचा आणि पैसे उभे करण्याचा सल्ला देण्यात आला. उर्वरित पैशांची मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
मात्र या संपूर्ण प्रकारातून आपली फसवणूक झाल्याची खात्री पिंपळकर यांना झाली. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन पद्धतीने आपली मेहनतीची कमाई लुबाडण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ऑनलाइन सायबर तक्रार दाखल केली. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपळकर यांनी चंद्रपूर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर कक्षाचे पोलिस निरीक्षक सुनील गाडे करीत आहेत.




Petrol Price




