महत्वाच्या बातम्या

 एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई  : एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. एमपीएससीने एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी, आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेत नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित परीक्षा योजना तसेच नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करण्यात येईल असे एमपीएससीने सांगितले आहे. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

एमपीएससीने सुधारित परीक्षा योजना तसेच नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबतची माहिती एमपीएससीने ट्विटरवर दिली आहे. एमपीएससीने आपल्या ट्वीटमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे, असे सांगितले आहे.

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुण्यात आंदोलन केले जात होते. या आंदोलनाला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली होती. त्यानंतर राज्य सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 सालापासून लागू करावा, अशी विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही मागणी आता मान्य केली आहे.

  Print


News - Rajy
Related Photos