गुन्हेगारी टोळीवर पोलिसांचा कडक बडगा : तीन सराईत आरोपी एक वर्षासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या टोळीविरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विपीन इंगळे यांनी ही कारवाई राबविली. महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत प्रदान करण्यात आलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून संबंधित आरोपींना चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
हद्दपार करण्यात आलेल्या टोळीचा प्रमुख बादल वसंता हरणे (वय २२), श्रीराम वॉर्ड, बल्लारपूर असून त्याचे साथीदार यासिन अहमद सिद्दीकी (वय २९), सुभाष वॉर्ड, बल्लारपूर) आणि योगेश शंकर येरोल (वय २६), रवींद्र वॉर्ड, बल्लारपूर यांच्यावर खून, दंगा, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे अनेक दाखले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीला आर्थिक व मनुष्यबळाचे मोठे पाठबळ असून पूर्वी करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधात्मक कारवायांनंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांच्या सततच्या हालचालींमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी ही कठोर प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक ठरल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जनममवार, उमेश जोगदंड तसेच बल्लारपूर पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाने विशेष परिश्रम घेतले.
News - Chandrapur




Petrol Price




