महत्वाच्या बातम्या

 दोन घरांचे कुलूप फोडून चोरट्यांचा धुमाकूळ : दागिने व रोखीसह ८४ हजारांचा ऐवज लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर परिसरात अज्ञात चोरट्यांनी भररात्री धाडसी घरफोडी करत दोन घरांमधून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू असा तब्बल ८४ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन घरांवर डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याबाबत दशरथ विठुजी तुराळे (वय ६४), रा. विसापूर वार्ड क्र. १ यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ८ मे रोजी ते आपल्या मुलासह भद्रावती येथे मुलीकडे गेले होते. दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातील सामानाची मोठ्या प्रमाणात उलथापालथ करण्यात आली होती. तांदळाच्या डब्यात लपवून ठेवलेला सोन्याचा गोफ, सोन्याची अंगठी, २२ हजारांची रोख रक्कम तसेच चांदीचे दागिने असा सुमारे ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

विशेष म्हणजे, याच चोरट्यांनी शेजारील बंडू लक्ष्मण तवर यांच्या घराचेही कुलूप तोडून घरातील १५ हजार रुपये रोख, चांदीचे दागिने तसेच पितळ व पंचधातूच्या वस्तूंवर हात साफ केला. या घरातून सुमारे २२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.

दरम्यान, विसापूर गावात भुरट्या चोरांच्या हालचाली वाढल्या असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गावात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवून भुरट्या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

एकाच रात्री दोन घरांवर डल्ला मारण्यात आल्याने विसापूर परिसरात खळबळ उडाली असून बल्लारपूर पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत पुढील तपास करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos