स्वाभिमानाने जगतांना मिळणारा आनंद पैशातून मिळवता येत नाही : गंगुबाई (अम्मा) जोरगेवार


- नवजीवन महिला योग समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आज वयाच्या ८० व्या वर्षीही टोपल्याचे दुकान लावते. पैसे नाही म्हणुन आता दुकान लावत नाही तर या व्यवसायातुन मिळणाऱ्या पैशावर हक्क आहे. ते कुठ आणि किती खर्च करायचे तो अधिकार आहे. हे माझ दुकान आहे, या दुकानाची मालकीन आहे. आणि या स्वाभिमानाने जीवन जगतांना मिळणारा आनंद पैशाने कधीच मिळवता येऊ शकत नाही. त्यामुळे आत्मनिर्भर बना स्वाभिमानाने जगा, असे प्रतिपादन गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांनी केले.
नवजीवन महिला योग समितीच्या वतीने तुकुम येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सपना सुधिर मुनगंटीवार, डॉ. शर्मीला पोद्दार, डॉ. गोपाल मुंधढा, योग गुरु विजय चंदावार, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टुवार, सपना नामपल्लीवार, शुभांगी डोंगरवार, वनश्री मेश्राम, संगीता चव्हाण आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होते.
यावेळी पुढे बोलतांना अम्मा म्हणाल्या की, जागतिक महिला दिनाच्या अनेक कार्यक्रमांचे आमंत्रण येत आहे. त्या प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणाने कष्ट करण्याचा मुलमंत्र मी देत आहे. आज युग बदलले आहे. आज कामावर न जाण्याचे अनेक कारणे आपल्याकडे तयार असतात. हेच कारणे तुम्हाला एक दिवस आळशी बनवतील. आळस हा मानसाचा शत्रु आहे. हे आम्ही बोलतो, ऐकतो मात्र आपल्यातील या शत्रुला संपविण्यासाठी आपण किती जन प्रयत्न करत आहोत याचे साऱ्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. आमच्या काळात मेहनतीला अधिक महत्व होते. कामावर न जाण्याचे कारण आम्ही कधीच शोधत बसलो नाही. दिड वर्षाच्या लहाण बाळाला मांडीवर बसवुन भर उन्हात फुटपाथवर मी टोपल्या विकल्या आहे. आणि हे सांगतांना मला कधीही कमीपणा वाटत नसल्याचे त्या यावेळी म्हणाले.
कष्ट आणि प्रामाणिकता जोरगेवार परिवारातील संस्कारचा भाग आहे. आज माझा मुलगा आमदार झाला आहे. मात्र त्यानेही मेहनत सोडलेली नाही. मी झोपून असतांनाच सकाळी तो कार्यक्रमांसाठी निघून जातो आणि मी झोपल्यावर कधी रात्रोचे १२ तर कधी १ वाजता घरी येतो. एकाच घरी राहुन कित्येक दिवस आमची भेट होत नाही. हे सांगण्या मागच कारण फक्त येवढच, गरिबी आली तर लाजायच नाही आणि पैसा आला तर माजायाचे नाही या तत्वावर आजही जोरगेवार परिवार समोर जातोय, आज आमच्या लेकीही अनेक क्षेत्रात समोर जात आहे. तुम्ही आत्मनिर्भर बना, पैसे कमी मिळाले तरी चालेल पण नौकर बनण्यापेक्षा मालक बनुन स्वाभिमानाने जगा असेही यावेळी त्या म्हणाले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नवजीवन महिला योग समितीच्या सदस्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
News - Chandrapur