महत्वाच्या बातम्या

 राजुरात बंद घर फोडून चोरी : २.५० लाखांचा ऐवज लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कुटुंबीय नागपूर येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि २ लाख रुपये रोख रकमेसह ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना राजुरा शहरातील किसान वॉर्ड मध्ये घडली. महेश अंबादास अरके ६२ वर्ष  सेवानिवृत्त शिक्षक हे ५ सप्टेंबर रोजी दुपारी कुटुंबीयांसह नागपूर येथे गेले होते.

कार्यक्रमानंतर ते तेथेच मुक्कामी राहिले. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात पाहणी केली असता दोन्ही बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त आढळले. कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली २ लाख रुपयांची रोख रक्कम, तसेच पत्नी व मुलीच्या सोन्याच्या बिऱ्या आणि सोन्याची अंगठी असा सुमारे ५० हजार रुपयांचा दागिन्यांचा ऐवज गायब असल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी अरके यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे करीत आहे.





  Print






Related Photos