ताडोबा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाकडून शाळेला शैक्षणिक मदतीचा हात

- नाशिक जिल्ह्याचे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांचा स्तृत्य उपक्रम
- सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा व जामसाळा या जि.प शाळेला ५० स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा संच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी देश-विदेशातुन अनेक पर्यटक सफारी करण्यासाठी येत असतात. काही पर्यटक केवळ वाघ बघुन तृप्त होतात तर काही सामाजिक भान ठेवून या अभयरण्याच्या सानिध्यात असलेल्या लोकवस्तीचा अभ्यास पण करतात. या कीर्र असलेल्या जंगलातील मानव वस्तीचे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक जिवनमान यांचा वैचारिक दृष्टिकोन ठेवून समाजाला काही देणं लागतो या भावनेतून मदतीचा हात पुढे करतात. असाच एक मदतीचा हात नाशिक येथील माजी अप्पर जिल्हाधिकारी सुधीर रकाटे यांनी सरसावला आहे.
सिरकाडा पर्यटन गेट जवळील एका खाजगी रिसोर्टमध्ये सुधीर रकाटे हे नेहमी आपल्या कुटुंबियांसोबत वाघांच्या दर्शनासाठी येत असतात. मागील वर्षी पण ते आले होते. या ताडोबा अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात वसलेल्या सिरकाडा गावाला त्यांनी भेट दिली होती. येथील वर्ग १ ते ४ असलेल्या शाळेत भेट देवून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असलेले ५० पुस्तकांचा संच भेट म्हणून दिला होता. या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामसाळा जुना येथील विद्यार्थ्यांनी केलेली दैदिप्यमान कामगिरी, सातत्याने नवोदयला पात्र होणे, शिष्यवृत्ती पात्र होणे, एकलव्य स्पर्धा परीक्षा, सैनिकी शाळा स्पर्धा परीक्षा हे बघता समाजातील शिक्षणाप्रती जागरूक असलेले सुधीर यांनी गुरुवार दिनांक २७ ऑगस्ट २०२६ ला ५० पुस्तकाचा संच भेट म्हणून दिला.
त्यांनी शाळेची शैक्षणिक प्रगती उंचावत राहावी याकरिता विविध शैक्षणिक पुस्तके कथासंग्रह, पंचतंत्र, विज्ञानावर आधारित पुस्तके, शब्दकोश स्कॉलरशिप अशाप्रकारे विविध पुस्तकांची निवड केली आहे. यासाठी ज्या रिसोर्टमध्ये जेव्हा कधी थांबतात तेव्हा त्या परिसरातील शाळांची माहीती घेत असतात. जामसाळा जि.प शाळेला पुस्तके वितरण करतांना काही कारणास्तव ते स्वतः उपस्थित राहू शकले नाही परंतु शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निकेश मेश्राम यांच्या मार्फतीने सदर पुस्तके शाळेपर्यंत पोहोचवली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांसाठीच्या या बहुमूल्य योगदानाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक जामसाळा जुना येथील मुख्याध्यापक, शिक्षक तथा शाळा व्यवस्थापन समिती तर्फे मनःपूर्वक आभार मानले आहेत.




Petrol Price




