महत्वाच्या बातम्या

 कारवाफा आश्रमशाळेत सेवा संकल्प अभियान उत्साहात


- शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांसह करिअर मार्गदर्शन : महिनाभर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे १७ सप्टेंबरपासून ते १७ ऑक्टोबर पर्यंत महिनाभर राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक  उपक्रमांसह करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव, पर्यावरण संवर्धन, आरोग्यविषयक जागरूकता  व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठा, सामाजिक जाणीव व सकारात्मक दृष्टिकोन रुजविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्यात नेतृत्वगुण, सर्जनशीलता, आत्मविश्वास व समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना विकसित व्हावी, हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश होता.

विविध उपक्रमांचे आयोजन -
या अभियानांतर्गत चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, वृक्षारोपण, सुकन्या समृद्धी योजना जनजागृती, आरोग्य व व्यसनमुक्तीविषयक समाजप्रबोधन, योग व प्राणायाम, युवा संवाद, स्वच्छता अभियान, बचत गट स्थापन मोहीम, सांस्कृतिक कार्यक्रम, रस्ते सुरक्षा जनजागृती, सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता व करिअर मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन महिनाभरात करण्यात आले.

जनजागृती रॅलीद्वारे सामाजिक प्रबोधन -
सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित जनजागृती रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांविषयी जनजागृती केली .समाजामध्ये स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्यविषयक जागरूकता, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन व सामाजिक जबाबदारी यांविषयी सकारात्मक संदेश रॅलीतून देण्यात आला.

विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व जबाबदार वर्तनाचे धडे -
पोलीस मदत केंद्र कारवाफाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वैभव तिडके यांनी शनिवार,१७ ऑक्टोबर रोजी करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक संधी, करिअर निवड व ध्येय निश्चिती यांविषयी उपयुक्त माहिती दिली.या अभियानांतर्गत पोलीस उपनिरीक्षक किशोर पुंड यांनी रस्ते सुरक्षा व सायबर गुन्ह्यांविषयीच्या जनजागृती कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सुरक्षित व जबाबदार वर्तनाचे महत्त्व समजावून सांगितले. 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव -
 युवा संवाद,स्पर्धा, आरोग्यविषयक जनजागृती व व्यसनमुक्ती कार्यक्रमांमधून निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले. योग व प्राणायामाच्या माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वृक्षारोपण व स्वच्छता उपक्रमांतून पर्यावरण संरक्षण व परिसर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.शालेय शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये व जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरले.

शाळेचे मुख्याध्यापक विष्णू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक टी . ए. आस्कर, सुधीर शेंडे, सी. डी. नळे, एम. ई. ठाकूर, व्ही. एस. देसू, चंदा वानखेडे, वर्षा मस्के, चंदा कोरचा, रविकांत पिपरे, संजय धंदर, विवेक नैताम, बालाजी पंडागळे, इंदरशाहा कुमरे, कविता बरसागडे, अधीक्षक भारत कोरडे, अधीक्षिका उज्वला साव, विनोद जाधव, योगेश उसेंडी,हितेश गावळकर, स्वप्निल राठोड, पवन मेश्राम, अभय कांबळे, करिश्मा गोवर्धन, दीक्षा कोवे, सुनिता देवावार, व्यंकटेश उईके यांच्यासह शाळेतील इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभियानाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.





  Print






Related Photos