लिफ्टच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची छेड : शेगाव पोलिसांनी आरोपीला २४ तासांत ठोकल्या बेड्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिची छेड काढून पसार झालेल्या अज्ञात आरोपीचा शेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोध घेऊन त्याला अटक केली. गणेश बाजुराम कुमावत ३४ वर्ष रा. बोर्डा, ता. वरोरा, मूळ रा. बासडी खुर्द, जि. जयपूर, राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त केले आहे. प्राप्त माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता टेमुर्डा येथे एक अल्पवयीन मुलगी शाळेत जात होती. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसविले. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने चालत्या दुचाकीवरून उडी घेतली.
या घटनेत तिला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपीबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसतानाही पोलिसांनी टेमुर्डा, वरोरा तसेच परिसरातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबविली. तांत्रिक बाबींचा तपास तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. कौशल्यपूर्ण तपासाअंती पोलिसांनी २४ तासांच्या आत गणेश कुमावत याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी शेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ७४ तसेच पोक्सो कायदा २०१२ मधील कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेंद्रसिंग यादव, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पोले, पोलिस उपनिरीक्षक सुमित कांबळे, सफौ दिलीप सूर, पोलिस हवालदार अविनाश तुरणकर, दिनेश तारेवार आणि पोलिस शिपाई प्रशांत गिरडकर यांनी केली.




Petrol Price




