रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान : शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन


- मका, ज्वारी, मसूर, हरभरा, करडई व भुईमुगासाठी विविध योजनांचा लाभ; ॲग्रीस्टॅक नोंदणी व फार्मर आयडी बंधनकारक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सन २०२६-२०२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासोबतच सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढावा, यासाठी कृषी विभागाकडून विविध अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकरी, नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषिक्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान (अन्नधान्य पिके), कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसेच राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत मका, ज्वारी, मसूर, हरभरा, करडई आणि भुईमूग या पिकांसाठी विविध घटकांमध्ये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. लाभार्थ्यांची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून फार्मर आयडी प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच सन २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्याने अधिकाधिक महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
मका व ज्वारीच्या पीक प्रात्यक्षिकांना १०० टक्के अनुदान -
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत मका व ज्वारीच्या पीक प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या घटकासाठी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषिक्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे.
प्रमाणित बियाणे वितरणांतर्गत ज्वारीच्या १० वर्षांच्या आतील वाणांसाठी बियाण्यांच्या किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ३ हजार रुपये, यापैकी कमी असलेल्या रकमेइतके अनुदान मिळणार आहे. तर १० वर्षांवरील ज्वारीच्या वाणांसाठी बियाण्यांच्या किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपये, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल.
मक्याच्या १० वर्षांच्या आतील वाणांसाठी बियाण्यांच्या किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल १० हजार रुपये, यापैकी कमी असलेल्या रकमेइतके अनुदान उपलब्ध आहे. प्रमाणित बियाणे वितरणाचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे.
मसूर व हरभऱ्यालाही अनुदानाची साथ -
कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत मसूर आणि हरभरा पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या प्रात्यक्षिकांसाठी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषिक्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांची महाडीबीटीवरील अर्जांच्या आधारे निवड केली जाणार आहे.
प्रमाणित बियाणे वितरणांतर्गत मसूरच्या पाच वर्षांच्या आतील वाणांसाठी बियाण्यांच्या किमतीच्या १०० टक्के किंवा प्रतिक्विंटल १२ हजार रुपये, यापैकी कमी असलेल्या रकमेइतके अनुदान मिळेल. पाच वर्षांवरील मसूर वाणांसाठी किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ६ हजार रुपये, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे.
हरभऱ्याच्या पाच वर्षांच्या आतील वाणांसाठी बियाण्यांच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा प्रतिक्विंटल ६ हजार रुपये, यापैकी कमी असलेल्या रकमेइतके अनुदान देण्यात येईल. या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
करडई व भुईमुगासाठीही प्रात्यक्षिकांना १०० टक्के अनुदान -
राष्ट्रीय खाद्य तेल अभियान–तेलबिया अंतर्गत करडई आणि भुईमूग पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदान उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषिक्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा.
अभियानाच्या मूल्य साखळी कार्यक्रमांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी करडईला प्रतिक्विंटल १० हजार ५०० रुपये, तर भुईमुगाला प्रतिक्विंटल १२ हजार ५०० रुपये अनुदान दर निश्चित करण्यात आला आहे. या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषिक्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना अर्ज करता येणार आहे.
पीक प्रात्यक्षिकांसाठी गटाची नोंदणी आवश्यक -
पीक प्रात्यक्षिकांचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकरी गटाची नोंदणी ३१ मार्च २०२६ पूर्वीची असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित गट कोणत्याही शासनमान्य यंत्रणेकडे नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. गटातील लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी झालेली असणेही आवश्यक आहे.
एका कुटुंबातील पती, पत्नी आणि अविवाहित प्रौढ अपत्य यांपैकी केवळ एका व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्याला आर्थिक सहाय्याचा लाभ कमाल एक हेक्टर क्षेत्रापुरता मर्यादित राहणार आहे.
संबंधित बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि फार्मर आयडीच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.
महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन -
जिल्ह्यातील पात्र शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि संबंधित संस्थांनी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अर्ज करावा. अनुदानाचे घटक, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जप्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.




Petrol Price




