सोयाबीनचे घरगुती बियाणे तयार करा : पुढील हंगामातील खर्च वाचवा


- वर्धा जिल्ह्यात १ लाख १९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी; दर्जेदार बियाणे निवडून योग्य साठवणूक करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : खरीप हंगामातील सोयाबीन पिकातून मिळणाऱ्या दर्जेदार उत्पादनाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी घरगुती पद्धतीने बियाणे तयार करून साठवावे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्यामुळे दरवर्षी संपूर्ण बियाणे बाजारातून खरेदी करण्याची आवश्यकता नाही. योग्य वाणाची निवड, बियाणे तयार करण्याची शास्त्रीय पद्धत आणि योग्य साठवणूक केल्यास पुढील हंगामासाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यात चालू खरीप हंगामात एकूण खरीप पिकांच्या सरासरी क्षेत्रापैकी सुमारे २९.४२ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. हे क्षेत्र १ लाख १९ हजार ६१९.७० हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असल्याने पुढील हंगामासाठी स्वतःच्या शेतातील दर्जेदार बियाणे तयार करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.
दर्जेदार आणि शुद्ध बियाण्याची निवड महत्त्वाची -
घरगुती बियाणे तयार करताना चालू हंगामात प्रमाणित बियाणे किंवा मागील दहा वर्षांच्या आतील प्रसारित वाणाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील निरोगी, शुद्ध आणि दर्जेदार सोयाबीनची निवड करावी. बियाणे तयार करण्यासाठी निवडलेल्या क्षेत्रात इतर वाणांची भेसळ आढळल्यास अशी झाडे काढून टाकावीत.
निवडलेल्या प्लॉटच्या सभोवताली सुमारे तीन मीटर अंतर सोडून आतील भागातील सोयाबीनचे उत्पादन बियाण्यासाठी वापरावे. यामुळे बियाण्याची शुद्धता राखण्यास मदत होते. बियाण्यासाठी निवडलेल्या पिकाची योग्य निगा राखणे आणि काढणीपासून साठवणुकीपर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
काढणी आणि मळणी करताना घ्या विशेष काळजी -
सोयाबीनचे पीक परिपक्व अवस्थेत असताना टेबुकोनॅझोल या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी. त्यानंतर पीक योग्य वेळी कापून सोयाबीनची चांगली सुकवणूक करावी. बियाण्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी मळणी शक्यतो पारंपरिक पद्धतीने करावी. यंत्राद्वारे मळणी करायची असल्यास मळणी यंत्राचा वेग योग्य मर्यादेत ठेवावा, जेणेकरून बियाण्याला तडे जाणे किंवा त्याचे नुकसान होणे टाळता येईल. तयार बियाण्यातील आर्द्रता ९ ते १२ टक्के राहील, याची दक्षता घ्यावी. काढणी, मळणी, पोत्यांमध्ये भरणे आणि वाहतूक करताना बियाण्याची आदळआपट होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.
राख आणि कडुनिंबाच्या पानांचा वापर करून साठवणूक -
तयार केलेले सोयाबीन बियाणे ५० किलो क्षमतेच्या तागाच्या गोण्यांमध्ये भरून साठवावे. साठवणुकीच्या वेळी राख आणि कडुनिंबाच्या पानांचा वापर करावा. बियाणे साठवण्याची जागा कोरडी असावी.गोण्या थेट जमिनीवर न ठेवता जमिनीपासून १० ते १५ सेंटीमीटर उंचीवर लाकडी फळ्यांवर ठेवाव्यात. तसेच गोण्या भिंतीपासून अंतर ठेवून रचाव्यात. एका थप्पीत आठपेक्षा अधिक गोण्या ठेवू नयेत. या पद्धतीमुळे साठवणुकीदरम्यान बियाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत होते.
तीन टप्प्यांत तपासा बियाण्याची उगवणक्षमता -
साठवलेल्या बियाण्याची उगवणक्षमता नियमित तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डिसेंबर, मार्च आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरगुती पद्धतीने बियाण्याची उगवणक्षमता तपासावी. यामुळे पुढील खरीप हंगामात पेरणीच्या वेळी बियाणे वापरण्यास योग्य आहे की नाही, याची खात्री करता येते. तसेच बियाण्याच्या उगवणक्षमतेनुसार पेरणीसाठी आवश्यक बियाण्याचे प्रमाण निश्चित करता येते. त्यामुळे कमी उगवणक्षमतेच्या बियाण्यामुळे पिकाची उगवण विरळ होण्याचा धोका कमी करता येऊ शकतो.
अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधा -
शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे तयार करताना योग्य वाणाची निवड, शुद्धता, सुकवणूक, आर्द्रतेचे प्रमाण आणि सुरक्षित साठवणूक या बाबींना प्राधान्य द्यावे. यासंदर्भात अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कृषी विभागाच्या १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेता येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.




Petrol Price




