महत्वाच्या बातम्या

 गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती


- लोकसंवाद-२०२६ अभियानांतर्गत सोमनाळा व पिंपळगाव येथे उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर लोकसंवाद-२०२६ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळांच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासोबतच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे तसेच पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत विविध शासकीय विभागांच्या स्थानिक तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध कल्याणकारी योजनांची माहिती, योजनांसाठीची पात्रता, अर्ज प्रक्रिया तसेच उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पिंपळगाव येथे १७ सप्टेंबरला लोकसंवाद -
बाल गणेश उत्सव मंडळ, पिंपळगाव येथे १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती कायदा व परिवीक्षा अधिकारी प्रियंका पशिणे नागरिकांना देणार आहेत.

सोमनाळा येथेही लोकसंवाद -
बाल गणेश उत्सव मंडळ, सोमनाळा येथेही लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या कायदा व परिवीक्षा अधिकारी प्रियंका पशिणे उपस्थित नागरिकांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करणार आहेत. गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी या लोकसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






Related Photos