महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाहीत घरफोडी : अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लांबविला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सिंदेवाही शहरातील साईनगर परिसरात घराचे कुलूप व मुख्य दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भगवान कवडू मंडलवार (वय ५१) हे साईनगर येथे पत्नी, आई व मुलासह राहतात. त्यांचे सिंदेवाही येथे गुरुकृपा डेली निड्सचे दुकान आहे. ८ सप्टेंबर रोजी कामानिमित्त ते सकाळी गुरुकुंज मोजरी येथे गेले होते. दुपारी त्यांच्या आईने आपण भावाकडे मालपिरंजी येथे जात असल्याचे त्यांना फोनवरून कळविले होते. त्यानंतर घराला कुलूप लावण्यात आले होते.

दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास शेजारील महिलेने मंडलवार यांना फोन करून त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर मंडलवार यांनी पुतण्या महेश याला घरी पाठविले. महेशने पाहणी केली असता मुख्य दरवाजा अज्ञात व्यक्तीने अवजाराच्या साहाय्याने उखडल्याचे दिसून आले. घरातील हॉल, बेडरूम तसेच कपाटांमधील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.

मंडलवार दुपारी सुमारे १२ वाजता घरी पोहोचल्यानंतर घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. लोखंडी कपाटातील प्लास्टिक डब्यात ठेवलेली तीन मंगळसूत्रे, अंगठ्या, बारी, जिवती, लॉकेट, बीरी तसेच चांदीची पायपट्टी आणि रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय लाकडी कपाटातील ४० हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली.

एकूण सुमारे २ लाख ४५ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपासून ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरून नेले. याप्रकरणी भगवान मंडलवार यांनी सिंदेवाही पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.





  Print






Related Photos