महत्वाच्या बातम्या

 तीन गुराख्यांचा बळी घेणारा नरभक्षी T-१२२ वाघ अखेर जेरबंद : महिनाभराच्या दहशतीनंतर सावलीकरांचा सुटकेचा श्वास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेले आपले माणसं पुन्हा सुखरूप घरी परततील की नाही, या चिंतेने ग्रासलेल्या सामदा आणि परिसरातील गावकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मागील महिनाभरापासून मृत्यूची दहशत निर्माण करणाऱ्या T-१२२ या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात सावली वनविभागाला यश आले आहे. या वाघाने तीन गुराख्यांचा बळी घेतल्याने परिसरातील अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. जंगलाच्या वाटेवर पाऊल टाकतानाही धडकी भरविणाऱ्या या वाघाला अखेर पकडण्यात आल्याने वनविभागासह नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रांतर्गत सामदा, निलसनी, पेडगाव, सोनापूर आणि वाघोली-बुटी परिसरात या वाघाने दहशत माजविली होती. उदरनिर्वाहासाठी गुरे चारायला जंगल परिसरात जाणाऱ्या गुराख्यांसाठी ही वाट जीवघेणी ठरली. तीन गुराख्यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबांचा आधार हिरावला गेला, तर गावकऱ्यांच्या मनात भीतीने घर केले. जंगलालगतच्या शेतात जाणे, गुरे चारणे आणि दैनंदिन कामांसाठी घराबाहेर पडणेही धोकादायक वाटू लागले होते. प्रत्येक दिवस चिंता आणि अनिश्चिततेत जात होता.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत वनविभागाने २७ सप्टेंबर २०२६ पासून वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. वाघाच्या हालचालींचा मागोवा घेत त्याला पकडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. अखेर महिनाभराच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि परिसरात दहशत निर्माण करणारा सहा वर्षांचा T-१२२ वाघ जेरबंद झाला. या कारवाईमुळे नागरिकांच्या मनातील भीती कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.

या मोहिमेत ३० बाय ३० मीटर आकाराच्या पिंजऱ्याचा वापर करण्यात आला. सावली वनविभागाने अशा प्रकारचा पिंजरा वापरण्याचा हा पहिलाच प्रयोग केला. वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी नऊ गरुड सीसीटीव्ही कॅमेरे, २० ट्रॅप कॅमेरे आणि तीन लाइव्ह कॅमेरे लावण्यात आले होते. सुमारे ५० ते ६० वनकर्मचारी आणि वनमजूर चोवीस तास वाघावर पाळत ठेवून होते. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत, संभाव्य धोके लक्षात घेऊन आणि काळजीपूर्वक नियोजन करत वनविभागाने ही मोहीम राबविली.

मुख्य वनसंरक्षक रामानुजम, चंद्रपूरचे विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे आणि सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात ही मोहीम पार पडली. मानद वन्यजीवरक्षक मुकेश भांदककर, वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर, जीवशास्त्रज्ञ अक्षय नारनवरे, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त डॉ. छोनकर, क्षेत्र सहाय्यक मारुती पुल्लेवाड आणि शूटर प्रदीप कोडापे यांच्यासह वनरक्षक शेडमाके, डांगे, खुडे, अक्षय मेश्राम, नंदकिशोर चणकापुरे आणि लंकेश आखाडे यांनी मोहिमेत सहभाग घेतला. मूल येथील एसटीपीएफ पथक, चंद्रपूर येथील आरआरयू पथक, वनमजूर आणि पीआरटी चमूनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

तीन गुराख्यांच्या मृत्यूने हादरलेल्या गावांसाठी वाघ जेरबंद झाल्याची बातमी मोठा दिलासा देणारी ठरली आहे. मात्र, या घटनेत जीव गमावलेल्या गुराख्यांच्या कुटुंबांचे दुःख कधीही भरून न निघणारे आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कायम राहणार आहे. एका बाजूला या कुटुंबांचे दुःख, तर दुसऱ्या बाजूला जंगलाच्या वाटेवरील दहशतीतून मुक्त होण्याची आशा, अशा भावनांच्या संमिश्र वातावरणात सावली वनविभागाच्या मोहिमेच्या यशाकडे पाहिले जात आहे.





  Print






Related Photos