बसपाच्या जिल्हा आढावा बैठकीत संघटन बळकटीचा निर्धार, नव्या नियुक्त्या जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बहुजन समाज पार्टीच्या (BSP) चंद्रपूर जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हा संघटनात्मक समीक्षा व आढावा बैठक शनिवारी २२ रोजी येथील पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊस येथे पार पडली. प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी काळातील पक्षाची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि विविध कार्यक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस प्रदेश महासचिव तथा विदर्भ झोन प्रभारी प्रा. डॉ. मोहन राईकवार, प्रदेश सचिव तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी इंजि. महेंद्र मकेश्वर, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार माजी आयआरएस संजय थूल, बीएसपी कायदेविषयक सल्लागार ॲड. पाटील, जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे, चंद्रपूर लोकसभा प्रभारी धर्मेश निकोसे, ओबीसी समाज नेते मंगेश ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत बीएलए-२ संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हा, विधानसभा आणि शहर स्तरावरील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पक्षाची संघटना बूथ आणि सेक्टर स्तरापर्यंत अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. आगामी काळात पक्षाच्या विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने बैठकीदरम्यान महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. प्रा. देविदास जांबोडे यांची माना समाज जिल्हा संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर प्रा. राजेश ब्राम्हणे यांच्यावर लोकसभा प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.दरम्यान, विकास शंकर कामडे, प्रवीण इस्तारी वडई आणि शिवाजी आढे यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.
बैठकीला जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, विधानसभा स्तरावरील पदाधिकारी तसेच शहर स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून तळागाळातील कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्यावर यावेळी भर देण्यात आला. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांनी केले. संचालन जिल्हा महासचिव सुभाषजी पेटकर यांनी केले, तर आभार जिल्हा कोषाध्यक्ष बंबोडे यांनी मानले.




Petrol Price




