मध्यरात्री कुकरी घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात


- श्रीराम वॉर्डातील स्मशानभूमीजवळ बल्लारपूर पोलिसांची कारवाई , धारदार शस्त्र जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील श्रीराम वॉर्ड परिसरातील स्मशानभूमीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास धारदार कुकरी घेऊन फिरणाऱ्या तरुणाला बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. दिपक उर्फ ए.टी.एम. अजय राजपूत (२२), रा. श्रीराम वॉर्ड, बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ५०० रुपये किमतीची लोखंडी कुकरी जप्त करण्यात आली. बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी व ऑल आऊट मोहीम राबविण्यात येत असताना पोलिसांना दिपक उर्फ एटीएम राजपूत याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. तो श्रीराम वॉर्डातील स्मशानभूमीजवळ धारदार शस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.
रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास पोलिसांनी स्मशानभूमीजवळ संशयित अवस्थेत आढळलेल्या दिपक राजपूत याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पँटमध्ये लपवून ठेवलेली लोखंडी कुकरी आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून शस्त्र जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या कुकरीची एकूण लांबी सुमारे ४२.०७ सेंटीमीटर असून पात्याची लांबी २८.०५ सेंटीमीटर व रुंदी ३.०५ सेंटीमीटर आहे.
या प्रकरणी आरोपी दिपक उर्फ ए.टी.एम. अजय राजपूत याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा सत्यवान कोटनाके, पोअं मिलिंद आत्राम, संदीप थेरे, शरदचंद्र कारुस यांनी केले




Petrol Price




