वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना लवकरच पदोन्नतीचा लाभ : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत


- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या कार्यकारिणीची कार्यशाळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
राज्यातील वीज कंपन्यांमधील कर्मचारी व कामगारांची पदोन्नतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा जट्टेवार सभागृहात आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष नागोराव मगर, सरचिटणीस सय्यद जहीरोद्दीन, महावितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक (नागपूर) सुहास रंगारी, संघटनेचे राज्य सचिव भाऊसाहेब भाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, तांत्रिक कामगार हा वीज कंपन्यांचा कणा आहे. आपल्या जीवाची बाजी लावून हे कामगार ग्राहकांना सेवा देण्यासाठी कार्यरत असतात. या तांत्रिक कामगारांचा थेट जनतेशी संबंध असतो. महापूर असो, चक्रीवादळ असो वा कोणतेही नैसर्गिक संकटात हा वीज कामगार पहिल्यांदा धावून जात असतो. कोरोनाच्या काळात या कामगारांनी राज्यातील वीज कधीही खंडीत होऊ दिली नाही. त्यांनी  कोरोना योद्धासारखे काम केले. वीज कामगार अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये  काम करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
वीज क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याचे सांगून डॉ. नितीन राऊत म्हणाले, वीज कंपन्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांच्या समस्यांची मला चांगली जाणीव आहे. या समस्या सोडविण्यासाठी मी सकारात्मक आहे. गेल्या काही वर्षांपासून वीज कंपन्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत सर्व कामगार संघटनांशी चर्चा करून मार्ग काढू. सकारात्मक दृष्टीकोनातून प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी केले. डॉ. राऊत यांचे रोपटे देऊन भाऊसाहेब भाकरे यांनी त्यांचे स्वागत  केले. यावेळी रक्षाबंधनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना राख्या बांधल्या.
  Print


News - Nagpur | Posted : 2021-08-22


Related Photos