राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील २-३ दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. १९ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 
पुढील तीन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. 
मुंबईत देखील पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. आज आणि उद्या मुंबई हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई १८ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा  अंदाज आहे. 
विदर्भात आज काही ठिकाणी प्रामुख्याने पश्चिम विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भात १७ आणि १८ ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. विदर्भासाठी १८ ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमाल आणि किमान तापमानात विदर्भात काही बदल बघायला मिळणार नाही. काही जिल्ह्यातील तापमान ३५-३६ डिग्री सेल्सिअसपर्यंत राहू शकते. 
  Print


News - Rajy | Posted : 2021-08-16


Related Photos