आरोग्य विभागाची मार्चमध्ये होणारी भरती अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : आरोग्य विभागात विविध पदांसाठी मार्च 2019 मध्ये भरती प्रक्रिया होणार होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या प्रक्रियेला स्थगिती दिली होती. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 8 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत भरतीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. मात्र, पुन्हा एकदा ही भरती अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदार विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला लागले आहे.
मार्च 2019 मध्ये पाच संवर्गासाठी आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी भरती होणार होती. ही प्रक्रिया राबवण्यासाठी विभागीय स्तरावरून एजन्सीची नेमणूकही करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने भरती प्रक्रिया रखडली. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत नेमण्यात आलेल्या एजन्सी व इतर सर्व प्रक्रियेला स्थगिती देऊन नव्याने एजन्सी नेमण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातील गट क मधील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक आदी पदांसाठीच्या भरती प्रक्रियेसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले होते. यामध्ये 15 व 16 ऑक्टोबरला परीक्षेचे आयोजन (ऑनलाइन पद्धतीने) करून अंतिम यादी प्रसिद्ध करून नियुक्तीचे आदेश देण्याचे जाहीर केले; परंतु ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गट क मधील विविध पदांसाठी होणारी भरती प्रक्रिया 2019 मधील आहे. त्यावेळी परीक्षेला बसणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकृती करून घेतली होती. त्यामुळे आता नव्याने अर्ज न घेता, त्या वेळचे उमेदवार गृहीत धरून भरती होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
News - Rajy | Posted : 2022-10-19