नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात धाडसत्र : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- राजुऱ्यात मांजा विक्रेत्यांना अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असलेल्या नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा विकला जात असून, मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी नायलॉन मांजाचा साठा केला आहे.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग राजपूत यांनी नायलॉन मांजाविक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिल्याने जिल्हाभरात धाडसत्र राबविण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी राजुऱ्यात मांजा विक्रेत्यांना अटक करीत लाखो रुपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार केले आहे.
या पथकाने रविवारी गोपनीय माहितीवरून राजेश सुधाकर येरावार (वॉर्ड नं. ७, रा. राजुरा) यांच्या गायत्री किराणा व्यावसायिक प्रतिष्ठानावर धाड घालून विविध कंपन्यांचा ५० हजार २०० रुपये किमतीचा मांजा जप्त केला आहे. राजेश येरावार याच्यावर कलम ५, १५ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ सहकलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पीएसआय अतुल कावळे यांच्या नेतृत्वात अनुप डांगे, जमीर पठाण, मिलिंद चव्हाण, नीतेश महात्मे यांच्या पथकाने केली आहे.
News - Chandrapur