महाज्योती चे एमपीएससी परीक्षेत ६३८ विद्यार्थी उत्तीर्ण
- राजपत्रित अधिकारी वर्ग- १ व वर्ग- २ पदावर होणार रुजू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) द्वारे 2022-23 वर्षात घेण्यात आलेल्या राजपत्रित अधिकारी वर्ग-1 व वर्ग-2 पदाच्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीत बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) च्या एकूण 638 विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे. मुलाखतीनंतरच्या प्रोव्हिजनल निकालात प्रवर्गाच्या एकूण 1 हजार 830 विद्यार्थ्यांमध्ये महाज्योतीचे ओबीसी- 370, एसबीसी- 34 व व्हीजेएनटी- 234 असे एकूण 638 समाविष्ट असल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.
राजेश खवले यांनी सांगितले की, राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. एमपीएससीने राजपत्रित अधिकारी वर्ग-1 व वर्ग-2 च्या एकूण 623 पदासाठी 2022-23 ला परीक्षा घेण्यात आली होती. यात राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात महाज्योतीद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ते मुख्य परिक्षेत पात्र झाले. यातील प्रोव्हिजनल निकालातील 638 यश प्राप्त केले आहे. अंतिमतः 623 उमेदवारांची निवड होणार असून अंतिम निकालात महाज्योतीचे विद्यार्थी घवघवीत यश प्राप्त करतील अशी आशा आहे.
विद्यार्थ्यांनी एकंदरीत मिळविलेले यश हे मिळालेल्या दर्जेदार प्रशिक्षणातूनच दिसून येत असल्याचा विश्वास राजेश खवले यांनी व्यक्त केले. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत प्रारूप गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
News - Nagpur