टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत गडचिरोलीत क्षयरोग जनजागृती रॅली


- जोष टीमच्या माध्यमातून एनसीसी कॅडेट्स व माय भारत स्वयंसेवकांचा जनजागृतीत सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधि / गडचिरोली : क्षयरोगाबाबत समाजातील गैरसमज व भीती दूर करणे आणि रुग्णांना उपचारांचा संपूर्ण कालावधी पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे, या उद्देशाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबीमुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने आज गडचिरोली येथे क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हा क्षयरोग केंद्र आणि शिवाजी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीत एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोटुले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. माधव शिंदे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य सातपुते आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. किरण शिंदे उपस्थित होते.
टीबीमुक्त भारत अभियानामध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी एनसीसी कॅडेट्स आणि माय भारत स्वयंसेवकांच्या सहभागातून जोष टीम तयार करण्यात आली आहे. विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत क्षयरोगाविषयी माहिती पोहोचविणे आणि क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना हातभार लावणे, ही या टीमची भूमिका असेल.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. किरण शिंदे यांनी विद्यार्थ्यांना टीबीमुक्त भारत ॲप, जोष टीमचे कार्य आणि क्षयरोग जनजागृतीमधील एनसीसीची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. युवकांनी जनजागृती उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन क्षयरोगाविषयी योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.
डॉ. संतोष कोटुले यांनी ग्रामीण भागातील जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन केले. एनसीसी कॅडेट्सनी गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या मनातील क्षयरोगाबाबतची भीती, गैरसमज आणि रुग्णांविषयी असलेला सामाजिक कलंक दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, उपचार सुरू असलेल्या रुग्णांना निर्धारित कालावधीपर्यंत नियमित औषधोपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले. निक्षय मित्र म्हणून रुग्णांना आधार देण्याच्या भूमिकेबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी टीबी हारेगा, देश जीतेगा आणि करना है, करके दिखाएंगे; भारत को टीबीमुक्त बनाएंगे अशा घोषणा देत क्षयरोगमुक्त भारताचा संदेश दिला. क्षयरोगाबाबत जनजागृती आणि रुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या कार्यात युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.




Petrol Price




