महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यातील १,२४८ शाळांचे अंगण पुन्हा गजबजणार : सोमवार पासून द्वितीय शैक्षणिक सत्राला प्रारंभ


- दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या; विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज – विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची राहणार रेलचेल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले शाळांचे परिसर आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. ५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत देण्यात आलेल्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या असून, २२ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने सोमवार, २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळा नियमितपणे सुरू होणार आहेत. यासह जिल्ह्यातील एकूण १,२४८ शाळांमध्ये द्वितीय शैक्षणिक सत्राला उत्साहात सुरुवात होणार आहे.

जिल्हा परिषद, नगर परिषद, समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाच्या शाळा, सैनिकी शाळा तसेच खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा यामध्ये समावेश आहे. दीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळांमधील वर्गखोल्या आणि परिसर स्वच्छ करण्यात आले असून, शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

विविध शैक्षणिक उपक्रमांची रेलचेल -
द्वितीय शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांसह राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी, पूर्वतयारी आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात संविधान दिन, पॅट चाचणी, अभिव्यक्ती सप्ताह, विद्यार्थी मेळावा आणि माझी शाळा सुंदर शाळा यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय शैक्षणिक सहली आणि विद्यार्थी संमेलनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शाळांच्या सुविधांची होणार तपासणी -
द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढविणे आणि शैक्षणिक दर्जा उंचावणे याला शिक्षण विभागाकडून प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी शाळांमधील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहांची स्थिती, क्रीडा सुविधा तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणासोबतच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांची तयारी वेग घेणार -
द्वितीय शैक्षणिक सत्र सुरू होताच शाळांमध्ये अभ्यास आणि परीक्षांच्या तयारीला वेग येणार आहे. विशेषतः दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी कालावधी महत्त्वाचा असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षा घेणे, प्रात्यक्षिक परीक्षांची तयारी, अभ्यासक्रमाची उजळणी आणि सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शनही केले जाणार आहे.

दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त सुट्टी असल्याने पहिल्याच आठवड्यात शैक्षणिक कामकाजात खंड पडणार आहे. असे असले तरी सोमवारपासून शाळांमध्ये पुन्हा प्रार्थनेचे सूर, विद्यार्थ्यांचा गोंगाट आणि वर्गखोल्यांमधील उत्साह अनुभवायला मिळणार आहे.

तालुकानिहाय शाळांची संख्या -
जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
भंडारा तालुक्यात १६४ प्राथमिक व ७७ माध्यमिक अशा एकूण २४१ शाळा आहेत. लाखांदूर तालुक्यात ९५ प्राथमिक व ४० माध्यमिक मिळून १३५, लाखनी तालुक्यात १०० प्राथमिक व ४६ माध्यमिक मिळून १४६, तर मोहाडी तालुक्यात ११६ प्राथमिक व ४० माध्यमिक मिळून १५६ शाळा आहेत. पवनी तालुक्यात १४६ प्राथमिक व ४१ माध्यमिक मिळून १८७, साकोली तालुक्यात ११४ प्राथमिक व ४० माध्यमिक मिळून १५४, तर तुमसर तालुक्यात १७६ प्राथमिक व ५३ माध्यमिक मिळून २२९ शाळा आहेत.

अशा प्रकारे भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये एकूण ९११ प्राथमिक आणि ३३७ माध्यमिक अशा मिळून १,२४८ शाळांमध्ये सोमवारपासून द्वितीय शैक्षणिक सत्राचा प्रारंभ होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही शैक्षणिक कामकाजासाठी पुन्हा लगबग सुरू होणार आहे.





  Print






Related Photos