कोटगल येथे पहिल्यांदाच भव्य तान्हा पोळा उत्सव उत्साहात


- २५ नंदीबैलांचा सहभाग; ओम मुडके प्रथम, सानवी ईनामवार द्वितीय तर लितीशा खोबरे तृतीय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / कोटगल (गडचिरोली ) : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे जतन आणि बालकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कोटगल येथे पहिल्यांदाच भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेला तान्हा पोळा उत्सव २०२६ उत्साहपूर्ण, आनंददायी आणि आल्हाददायक वातावरणात दिमाखात पार पडला. साथ फाउंडेशन, हनुमान मंदिर समिती आणि एकता शारदा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर परिसरात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कोटगल गावाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात तान्हा पोळा उत्सव साजरा करण्यात आल्याने बालगोपाळांसह ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
२५ नंदीबैलांसह बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग -
तान्हा पोळ्यानिमित्त आयोजित नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेत परिसरातील बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लहान मुलांनी लाकूड आणि मातीपासून तयार केलेले सुमारे २५ आकर्षक नंदीबैल सजवून आणले होते. विविध रंग, फुलांची सजावट आणि पारंपरिक पद्धतीने नटविण्यात आलेल्या नंदीबैलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नंदीबैलांसोबतच बालकांनी आकर्षक आणि नयनरम्य वेशभूषा परिधान करून उत्सवाची रंगत वाढविली. ‘सजला नंदी, नटली बालकंपनी!’ या घोषणेने हनुमान मंदिर परिसर दुमदुमून गेला.
ओम मुडकेने पटकावला प्रथम क्रमांक -
नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेत चि. ओम मुडके याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला संगीता विजय गद्देवार यांच्या वतीने शाळेची बॅग पारितोषिक म्हणून देण्यात आली. सानवी ईनामवार हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तिला गडचिरोलीचे वनरक्षक अधिकारी संदीप के. कोहळे यांच्या वतीने शाळेची किट देण्यात आली. तर लितीशा खोबरे हिने तृतीय क्रमांक मिळविला. तिचा वॉटर बॉटल देऊन गौरव करण्यात आला. हे पारितोषिक कोटगल येथील माही एंटरप्रायजेसचे किरण चंदू भुरसे यांच्या वतीने देण्यात आले.
सर्व सहभागी बालमित्रांचा गौरव -
स्पर्धेतील केवळ विजेत्यांनाच नव्हे, तर सहभागी झालेल्या प्रत्येक बालकाच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम आयोजकांनी राबविला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व २५ बालमित्रांना आयोजकांच्या वतीने नंदीबैलासाठी विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण होण्यासोबतच पारंपरिक सण आणि लोकसंस्कृतीबद्दल आवड निर्माण होण्यास मदत झाली.
पुढील वर्षी अधिक भव्य आयोजनाचा संकल्प -
तान्हा पोळा उत्सवाला बालगोपाळ तसेच ग्रामस्थांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आयोजकांनी पुढील वर्षी हा उत्सव आणखी मोठ्या आणि भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला. पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या आणि भव्य-दिव्य स्वरूपात नंदीबैल स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
आयोजनाच्या यशस्वितेसाठी सहकार्य -
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी साथ फाउंडेशनचे पदाधिकारी, हनुमान मंदिर समितीचे सदस्य, एकता शारदा महिला मंडळाच्या कार्यकर्त्या तसेच कोटगल येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाला माही एंटरप्रायजेस, चेतन ग्राफिक्स, गणेश वेल्डिंग वर्क आणि विजय कृषि व किराणा स्टोअर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कोटगल येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या भव्य तान्हा पोळा उत्सवामुळे पारंपरिक लोकसंस्कृतीला उजाळा मिळण्यासोबतच बालकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. उत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांकडून आयोजकांचे तसेच सहभागी बालकांचे कौतुक करण्यात येत आहे.




Petrol Price




