महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी धानाची विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीतच करावी


- खासगी खरेदीदारांकडून अतिरिक्त कपातीचा धोका; चामोर्शी बाजार समितीत श्रीराम धानाला ५,०५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : शेतकऱ्यांनी आपला धान व इतर शेतमाल खासगी दुकानांमध्ये किंवा राईस मिलमध्ये विक्रीसाठी न नेता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत मार्केट यार्डमध्येच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले आहे. बाजार समितीत सध्या श्रीराम धानाला प्रतिक्विंटल ५,००० ते ५,०५० रुपये, तर मोहरा धानाला ४,१०० ते ४,२५२ रुपये भाव मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

वजनातील घट व अनधिकृत कपातीच्या प्रथा बंद -
कृषी उत्पन्न बाजार समितीने मागील १५ वर्षांत शेतमालाच्या खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. वजनकाट्यातील त्रुटी, शेतमालाच्या वजनातील घट आणि अनधिकृत कपातीसारख्या प्रथा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा बाजार समिती प्रशासनाने केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची विक्री अधिकृत बाजार समितीत केल्यास वजन व व्यवहाराबाबत अधिक सुरक्षितता मिळू शकते, असे सभापती अतुल गण्यारपवार यांनी सांगितले.

याउलट, काही खासगी खरेदीदार व राईस मिलचालक जादा भाव देण्याचे आमिष दाखवून प्रतिगोणी दोन किलो अतिरिक्त धानाची कपात करतात. तसेच माल सांडल्याच्या कारणावरूनही कपात केली जात असल्याने एका गोणीमागे सुमारे २०० रुपयांपर्यंत नुकसान होत असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे केवळ जादा भावाच्या आमिषाला बळी न पडता प्रत्यक्ष वजन, होणाऱ्या कपाती आणि अंतिम मिळणारी रक्कम यांचा विचार करून शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

एक लाख क्विंटल साठवण क्षमतेची सुविधा -
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये एक लाख क्विंटल शेतमाल साठवणुकीची क्षमता उपलब्ध आहे. बाजार आवाराला संपूर्ण संरक्षण भिंत असून सुरक्षित गोदामांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल येथे आणल्यानंतर पावसामुळे तो भिजण्याची किंवा चोरी होण्याची भीती कमी असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

शेतकऱ्यांना सुरक्षित वातावरणात शेतमालाची विक्री करता यावी, तसेच बाजार समितीच्या माध्यमातून कृषिमालाच्या व्यापाराला चालना मिळावी, या उद्देशाने बाजार समिती विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मार्केट यार्डला प्राधान्य द्यावे, असे आवाहन उपसभापती प्रेमानंद मल्लीक आणि सचिव नीलेश पिंपळकर यांनीही केले.

मका, चणा, तूर लिलावासह भाजीपाला मार्केट सुरू करण्याचे नियोजन -
शेतकऱ्यांना विविध पिकांच्या विक्रीसाठी स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समितीने आगामी काळासाठी विस्ताराचे नियोजन केले आहे. चित्तरंजनपूर (येणापूर) येथे मका, चणा आणि तूर या पिकांचे लिलाव सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच चामोर्शी येथे भाजीपाला व फळ मार्केट सुरू करण्याचीही योजना आखण्यात आली आहे.

या उपक्रमांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठांमध्ये जाण्याची गरज कमी होण्यास मदत होऊ शकते. स्थानिक बाजारपेठांचा विस्तार झाल्यास कृषिमालाच्या खरेदी-विक्रीला चालना मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांना विक्रीसाठी अधिक पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

बाजार समितीकडे सहा कोटींचा निधी -
कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सध्या सहा कोटी रुपयांचा निधी जमा असून, त्यापैकी तीन कोटी रुपये मुदतठेवीच्या स्वरूपात ठेवण्यात आले आहेत. उर्वरित निधीतून बाजार समितीच्या विकासासाठी मोठे प्रकल्प उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली.

शेतमालाची सुरक्षित साठवणूक, पारदर्शक खरेदी-विक्री व्यवहार आणि बाजारपेठेच्या विस्तारावर भर देत चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने आगामी काळात विविध विकासकामे हाती घेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा आणि शेतमालाची विक्री करताना वजन, कपात व प्रत्यक्ष मिळणाऱ्या मोबदल्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन सभापती अतुल गण्यारपवार, उपसभापती प्रेमानंद मल्लीक आणि सचिव नीलेश पिंपळकर यांनी केले आहे.





  Print






Related Photos