महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांनी मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर टाळावा


- जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकसंवाद उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मोबाईल आणि इंटरनेट हे ज्ञान व माहिती मिळविण्याचे प्रभावी साधन असले, तरी त्याचा अतिवापर विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतो. सोशल मीडियावर अनावश्यक वेळ न घालवता विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर प्रामुख्याने अभ्यास आणि आवश्यक माहिती मिळविण्यासाठी करावा. तसेच इंटरनेट वापरताना वैयक्तिक व गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ मुजावर अली यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत मुरलीधर बागला हायस्कूल येथे सायबर गुन्हे, सुरक्षित इंटरनेट वापर आणि पॉक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाला मुरलीधर बागला हायस्कूलचे प्राचार्य चरणदास राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, शिक्षिका भावना कोटनाके, प्रवीण गोरकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुजावर अली म्हणाले, आजच्या डिजिटल युगात कळत-नकळत विद्यार्थी आणि अल्पवयीन मुलांकडूनही सायबरविषयक चुका किंवा गुन्हे घडण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांचा मोबाईल वापरताना आर्थिक व्यवहारांशी संबंधित ॲप्स हाताळताना विशेष काळजी घ्यावी. फोनपे, गुगल पे यांसारख्या डिजिटल पेमेंट माध्यमांचा वापर करताना ओटीपी, पासवर्ड, यूपीआय पिन अथवा बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये.

फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि रील्स पाहण्यात विद्यार्थ्यांचा मोठा वेळ खर्च होत आहे. विद्यार्थी दशेत शिस्त, सातत्य आणि अभ्यासावरील लक्ष महत्त्वाचे असून, ध्येय गाठण्यासाठी वेळेचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वेळ वाया न घालवता विद्यार्थ्यांनी अभ्यास, वाचन आणि व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाईलमध्ये कोणतेही ॲप डाऊनलोड करताना ते विश्वासार्ह आहे की नाही, याची खात्री करावी. ॲपकडून मागितल्या जाणाऱ्या आदी परवानग्या विचारपूर्वक द्याव्यात. प्रत्येक ॲपला सरसकट सर्व परवानग्या देणे टाळावे. ऑनलाइन गेम खेळताना किंवा विविध ॲप्सचा वापर करताना वैयक्तिक डेटा संकलित होऊ शकतो. त्यामुळे आपली गोपनीय माहिती, छायाचित्रे, पासवर्ड किंवा इतर संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तींशी अथवा सार्वजनिक माध्यमांवर शेअर करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

पॉक्सो कायद्याचीही माहिती यावेळी विद्यार्थ्यांना लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२ बाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायद्यात विविध अपराधांसाठी शिक्षेच्या तरतुदी असून, सोशल मीडिया व इंटरनेटचा वापर करतानाही विद्यार्थ्यांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. ऑनलाइन माध्यमातून कोणी त्रास देत असल्यास, धमकी देत असल्यास किंवा संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीला तातडीने माहिती द्यावी.

कोणतीही आपत्कालीन किंवा अनुचित घटना घडल्यास ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधता येतो. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवरही तक्रार नोंदविता येते, अशी माहिती मुजावर अली यांनी विद्यार्थ्यांना दिली.





  Print






Related Photos