महत्वाच्या बातम्या

 चाकू हल्ला करून खुनाचा प्रयत्न : आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : किरकोळ वादातून तरुणावर चाकूने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी आरोपी शिवशांत ऊर्फ भिसू दामोदर भुर्रे याला पाच वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या न्यायालयाने गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

या प्रकरणातील माहितीनुसार, २ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सावलगाव येथील महेश प्रमोद तलमले १८ वर्ष हा आपल्या दोन मित्रांसोबत भाजीपाला खरेदी करण्यासाठी ब्रह्मपुरी येथील गुजरी वॉर्डात गेला होता. यावेळी सरकारी रुग्णालयाजवळ हनुमाननगर, ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या शिवशांत ऊर्फ भिसू दामोदर भुर्रे २१ वर्ष याने महेशसोबत असलेल्या एका मित्राला पाय आडवा घालून पाडण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारावरून महेश आणि त्याच्या मित्रांनी आरोपीला जाब विचारला. त्यातून वाद वाढला आणि आरोपीने शिवीगाळ करत महेशवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात महेशच्या छातीच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताच्या कोपरावर आणि तळहातावर चाकूचे वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर जखमी महेश याच्या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ आणि ५०४ अन्वये गुन्हा क्रमांक ०२/२०२० दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला. तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि अन्य पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता  अ‍ॅड. प्रशांत घट्टवार यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीपुरावे आणि वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ अन्वये दोषी ठरवले आणि पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनकुमार खेंडीकर यांनी केला. न्यायालयीन कामकाजात ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रकाश शेंदरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात दोषसिद्धी झाली.





  Print






Related Photos