साटोड्यातील नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम गुणवत्तापूर्ण करा


- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली पाहणी; विविध सुविधांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : साटोडा-आलोडी परिसरातील नागपूर वळणरस्त्यावर साटोडा चौक येथे सुमारे ८ कोटी रुपये खर्चातून नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या बांधकामाचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य केंद्राची इमारत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने उभारण्यासोबतच कामाला गती देऊन ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची सद्यस्थिती आणि प्रस्तावित सुविधांची माहिती पालकमंत्र्यांना दिली.
ग्रामीण नागरिकांना गावातच मिळणार आरोग्य सुविधा -
वर्धा शहरालगतच्या गावांची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य सुविधांची गरजही वाढत असल्याने नागरिकांना गावातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बोरगाव मेघे, सालोड, पिपरी मेघे आणि साटोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिली.
साटोडा येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर साटोडा-आलोडी तसेच परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी व उपचारांसाठी दूरवर जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सर्व निकषांचे पालन करून दर्जेदार आणि मजबूत पद्धतीने करण्यावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
आशांसाठी प्रशिक्षण केंद्राची सुविधा -
नवीन आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर जिल्ह्यातील आशा सेविकांसाठी प्रशिक्षण केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत आशा सेविकांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रशस्त व सुसज्ज जागा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यासाठी प्रशस्त सभागृहाची निर्मिती करण्याची सूचनाही त्यांनी केली. प्रशिक्षण, आरोग्यविषयक जनजागृती आणि विविध उपक्रमांसाठी या सभागृहाचा उपयोग करता येणार आहे.
बचत गटांना मिळणार व्यवसायाची संधी -
प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना खानपानाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आरोग्य केंद्र परिसरात बचत गटांना गाळे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक खानपानाची सुविधा मिळण्यासोबतच स्थानिक बचत गटांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
७० गट प्रवर्तकांसाठी स्वतंत्र सुसज्ज कार्यालय -
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जवळपास ७० गट प्रवर्तकांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज कार्यालयाची निर्मिती करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. बचत गटांच्या कामकाजासाठी तसेच प्रशिक्षण व समन्वयासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
या कार्यालयासोबतच प्रशस्त सभागृहाची सुविधा निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून बांधकामाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. भोयर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कामाच्या गुणवत्तेवर तडजोड नको -
सुमारे ८ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येत असलेली ही आरोग्य सुविधा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड करू नये, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक तपासणी करून दर्जेदार साहित्याचा वापर करावा आणि काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
साटोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे परिसरातील ग्रामीण नागरिकांना त्यांच्या गावाजवळच आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार असून, आशा सेविकांसाठी प्रशिक्षण सुविधा आणि बचत गटांसाठी व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्याने या प्रकल्पाला बहुउद्देशीय स्वरूप प्राप्त होणार आहे.




Petrol Price




