पोलीस स्टेशन मोहाडी येथील पोलीस नाईकावर एसीबीची कारवाई


- पाचशे रुपयांची लाच  स्वीकारण्याची दर्शविली तयारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
जप्त गाडीच्या संदर्भात कोर्टात हजर राहण्याबाबत नोटिस दिल्याचा मोबदला म्हणून ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने पोलीस स्टेशन मोहाडी जि.भंडारा येथील पोलीस नाईक अनुप टिकाराम वालदे (३१) यांच्यावर लाप्रवी पथकाने कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे झुल्लर तालुका मौदा जि.नागपूर येथील रहिवासी असून ते ड्रायव्हर म्हणून काम करतात. तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीचे टिप्पर गाडी ऑक्टोंबर २०२० मध्ये एका व्यक्तीस विक्री केली. सदर गाडी ज्या  व्यक्तीला विकली त्यांनी पूर्ण पैसे दिले नसल्याने ती अद्यापपर्यंत तक्रारदार यांचे नावे आहे. सदरची गाडी ज्या व्यक्तीला विकली त्या टिप्पर गाडीमध्ये अवैध रेती वाहतूक करीत असताना त्यास पोलीस स्टेशन मोहाडी येथील पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी पकडून त्या संदर्भात कायदेशीर कारवाई करून तक्रारदार यांची टिप्पर गाडी जप्त केली. सदर जप्त टिप्पर गाडी सुपूर्तनाम्यावर सोडविण्याकरिता तक्रारदार हे पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना भेटले. त्यांनी टिप्पर गाडी सोडविण्याकरिता तक्रारदारास ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी मागणी केली लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवी भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
लाप्रवी रवी भंडारा येथील पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीय रित्या शहानिशा करून सापळा कारवाईची आयोजन केले त्यामध्ये १० जून २०२१ रोजी पडताळणी दरम्यान तक्रारदार हे पोलिस स्टेशन मोहाडी येथे गेले असता पोलीस उपनिरीक्षक जाधव हे तक्रारदार यांना भेटले नाहीत. त्यावेळी तक्रारदार हे  नाईक पोलीस अनूप टिकाराम वालदे यांना भेटली.  त्यांनी तक्रारदारास जप्त गाडीच्या संदर्भात कोर्टात हजर राहण्याबाबत नोटिस दिल्याचा मोबदला म्हणून ५००  रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने लाप्रवी पथकाने आज ९  ऑगस्ट  २०२१ रोजी पोलीस स्टेशन मोहाडी जि. भंडारा येथे ताब्यात घेतले. त्यावरून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मोहाडी येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदर कारवाई लाप्रवी नागपूरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलीस उपाधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, नपोशी कोमल बनकर, पो.शी सुनील हूकरे, चेतन पोटे यांनी केली. 
  Print


News - Bhandara | Posted : 2021-08-09Related Photos