१६ ऑगस्ट पासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं अंतर्गत मुल्यमापन करून निकाल  जाहीर करण्यात आला आहे. यानंतर आता अकरावीला प्रवेश  कसा मिळेल? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार झाला होता. पण आता अकरावी प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १६ ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज  करता येणार आहेत.
तत्पूर्वी विद्यार्थ्यांना मॉक डेमोची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा शुक्रवार १३ ऑगस्ट  पर्यंत उपलब्ध असणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्याना प्रवेश अर्ज कसा भरायचा याचा सराव करता येणार आहे. राज्यातील सहा महानगरांत अकरावीचा प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यासाठी १६ ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या सहा महापालिका क्षेत्रात अकरावीच्या प्रवेशासाठी ही ऑनलाइन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेपूर्वी राज्य मंडळातर्फे  सीईटी घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षेपूर्वी अर्जाचा पहिला भाग आणि परीक्षेनंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १३  ऑगस्टपर्यंत तात्पुर्ती नोंदणी (मॉक डेमो) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी मॉक डेमोसाठी भरलेली ही सर्व माहिती १३ ऑगस्टनंतर डिलीट केली जाणार आहे. त्यानंतर १६  ऑगस्टपासून प्रत्यक्षात ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरवा लागणार आहे. सीईटी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्राथमिक माहितीसोबत शुल्क भरुन अर्ज लॉक करायचा आहे. त्यानंतर सीईटी परीक्षेत मिळालेले गुण आणि पसंती क्रमांक यानुसार अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे. https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज भरता येणार आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-08-09Related Photos