आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंचा दमदार डंका

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नेपाळची राजधानी काठमांडू येथे २ ते ४ जून २०२६ दरम्यान नेपाळ कराटे फेडरेशनच्या वतीने आणि नॅशनल शोटोकान कराटे असोसिएशन (NSKA) संलग्न १७ व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठित स्पर्धेत भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आणि कतार या देशांतील जवळपास एक हजार खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
भारतीय संघात गडचिरोली जिल्ह्यातील ११ कराटेपटूंची निवड झाली होती. या खेळाडूंनी विविध गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदकांची कमाई केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गडचिरोलीचे नाव उज्ज्वल केले.
सब-ज्युनियर गटातील यश -
सब-ज्युनियर गटात पिंटू मंडल याने काता प्रकारात रौप्यपदक पटकावले.
कॅडेट गटातील चमकदार कामगिरी -
कॅडेट मुलींच्या गटात आरोही चव्हाण हिने काता आणि कुमिते (-५० किलो) या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकून दुहेरी यश संपादन केले. तर रोमन टिंगूसले याने काता प्रकारात रौप्यपदक आणि कुमिते (-४८ किलो) प्रकारात कांस्यपदक मिळविले.
ज्युनियर गटात पदकांची बरसात -
ज्युनियर गटात गडचिरोलीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.
पियुष गारगाठे – कुमिते (-५५ किलो) सुवर्णपदक, काता कांस्यपदक
प्रियांशु साहारे – काता सुवर्णपदक, कुमिते कांस्यपदक
अंगत जवादे – काता रौप्यपदक, कुमिते (-५२ किलो) कांस्यपदक
सार्थक गेडाम – काता सुवर्णपदक, कुमिते (-६० किलो) कांस्यपदक
याशिवाय ज्युनियर टीम काता स्पर्धेत अंगत जवादे, पियुष गारगाठे आणि प्रियांशु साहारे या त्रिकुटाने कांस्यपदक जिंकत भारताला आणखी एक यश मिळवून दिले.
सिनियर गटातील सुवर्ण कामगिरी -
सिनियर गटातील टीम काता प्रकारात गडचिरोलीच्या शिहान योगेश चव्हाण, मिलिंद गेडाम आणि महेंद्र वटी यांनी सुवर्णपदक जिंकून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अनुभवी खेळाडूंनी आपल्या वयाची पर्वा न करता जोशपूर्ण आणि उच्च दर्जाचा खेळ सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यशाचे श्रेय सर्वांच्या सहकार्याला -
गडचिरोलीच्या कराटेपटूंनी शालेय, संघटनात्मक तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने उच्च दर्जाची कामगिरी बजावली आहे. या यशाचे श्रेय खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली, जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वाघरे, उपाध्यक्ष रुपराज वाकोडे, अविनाश वरगंटीवार, सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, पत्रकार बांधव आणि कराटेप्रेमींना दिले आहे.
या उल्लेखनीय यशामुळे गडचिरोली जिल्ह्याची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम झाली असून, जिल्ह्यातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




