तोरगाव येथे अवैध दारू विक्रेत्यांवर एलसीबीची धडक कारवाई : ४४ हजार ९६० रुपयांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मौजा तोरगाव ता. ब्रम्हपुरी येथे अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध मद्यविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
१३ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५(इ), ८३ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. सदर प्रकरणी अप.क्र. ४६३/२६ व ४६४/२६ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईत आरोपी शैलेंद्र रामटेके (वय ५४, रा. तोरगाव) याच्या ताब्यातून ४ पेट्या म्हणजे १९२ नग देशी दारूच्या १८० मिलीच्या बाटल्या किंमत १५ हजार ३६० रुपये तसेच १ पेटीतील १०० नग ९० मिलीच्या देशी दारूच्या बाटल्या किंमत ४ हजार रुपये असा एकूण १९ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत आरोपी पितांबर लुटे (वय ३४, रा. तोरगाव) याच्याकडून ३ पेट्या म्हणजे १४४ नग देशी दारूच्या १८० मिलीच्या बाटल्या किंमत ११ हजार ५२० रुपये, १ पेटीतील १०० नग ९० मिलीच्या देशी दारूच्या बाटल्या किंमत ४ हजार रुपये तसेच १ पेटीतील ४८ नग विदेशी दारू नं. १ च्या १८० मिलीच्या बाटल्या किंमत १० हजार ८० रुपये असा एकूण २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी एकूण १० पेट्यांमधील देशी व विदेशी दारूसाठा असा ४४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार जयंता चूनारकर, नितेश महात्मे, सुनील आत्राम तसेच पोलीस अंमलदार रोहित व दिनेश आरडे यांनी पार पाडली.
News - Chandrapur




Petrol Price




