पूरग्रस्त भामरागड तालुक्यातून ३ गंभीर रुग्णांना तातडीने केले एअरलिफ्ट

- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार गतिमान मदतकार्य
- लॉयड लॉजिस्टिक्सच्या हेलिकॉप्टरचा आपत्कालीन वापर; तिघांचे वाचले प्राण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : मुसळधार पाऊस आणि पुराच्या वेढ्यामुळे संपर्क तुटलेल्या भामरागड तालुक्यातील तीन गंभीर आजारी रुग्णांसाठी जिल्हा प्रशासन देवदूत ठरले आहे. प्रकृती अत्यंत चिंताजनक बनलेल्या एका सात वर्षांच्या चिमुकलीसह तीन रुग्णांना रविवारी २७ सप्टेंबर तातडीने हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करून पुढील उपचारासाठी हेडरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या थेट मार्गदर्शन व निर्देशानुसार ही आपत्कालीन मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली.
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा येथून काल संगीता चुक्कू उसेंडी ७ वर्ष या चिमुकलीला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती अधिक बिघडल्याने तसेच रस्ते बंद असल्याने तिला पुढील उपचारासाठी तात्काळ हलवणे गरजेचे होते. यासोबतच अपेक्षा ऋषी आलाम आणि सिकलसेलचा त्रास असलेला रुग्ण रोशन चिना मडावी यांचीही प्रकृती खालावली होती.
पूरपरिस्थितीमुळे रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने वैद्यकीय कामासाठी या भागात उपलब्ध असलेल्या लॉयड मेटल्स कंपनीच्या हेलिकॉप्टरचा आपत्कालीन स्थितीत प्रशासनाकडून तत्परतेने वापर करण्यात आला. तिन्ही रुग्णांना लाहेरी येथून एअरलिफ्ट करून सुरक्षितपणे हेडरी येथील रुग्णालयात पोहोचवण्यात आले
प्रशासनाचा नेटका समन्वय -
या संपूर्ण मोहिमेचे नियोजन आणि समन्वय अहेरीचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत व भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी केले. रुग्णांसोबत निर्मला आलाम व चिना कुड्यामी हे नातेवाईक उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या या तात्काळ आणि संवेदनशील कार्यवाहीमुळे तिन्ही रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळून त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.




Petrol Price




