महत्वाच्या बातम्या

  सावंगी मेघेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १३ जुगारी जेरबंद


- ९ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; रोख रक्कम, मोबाइल, दुचाकी आणि ऑटो रिक्षांचा समावेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  वर्धा : शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सावंगी मेघे येथील मास्टर कॉलनी परिसरात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १३ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाइल फोन, दुचाकी आणि ऑटो रिक्षांसह तब्बल ९ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मास्टर कॉलनी परिसरातील एका ठिकाणी ५२ पत्त्यांवर मोठ्या प्रमाणात पैशांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह नियोजनबद्ध पद्धतीने संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी काही जण पैशांची बाजी लावत ५२ पत्त्यांवर जुगार खेळताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करून जुगार खेळणाऱ्या १३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराच्या डावातील रोकड तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात -
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली. त्यांच्याकडून १९ हजार ७०० रुपये रोख आढळून आले. याशिवाय जुगाराच्या डावावर लावण्यात आलेली २ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम, ५२ ताशांचे पत्ते आणि १ लाख ४० हजार रुपये किमतीचे १२ अँड्रॉइड मोबाइल फोन जप्त करण्यात आले. यासोबतच घटनास्थळी असलेल्या ६ दुचाकी वाहने आणि सुमारे ७ लाख ५० हजार रुपये किमतीच्या दोन ऑटो रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. अशा प्रकारे या कारवाईत एकूण ९ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुगार अड्ड्यांवर पोलिसांची नजर -
सावंगी मेघे परिसरातील मास्टर कॉलनीत सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईमुळे अवैध जुगार चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील तसेच परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची करडी नजर असून, गुप्त माहितीच्या आधारे अशा ठिकाणी कारवाई केली जात असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

कारवाईतील आरोपी -
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये सतीश विठ्ठल हुके, रमेश काशिनाथ कांबळे, पुरुषोत्तम वावरे, सुरज चहांदे, मयूर धोंगडे, संदेश रोशन थुल, सुशील दिगांबर वानी, प्रलय अशोक मस्के, सुनील उर्फ कंठ्या बहादुर सरदार, तेजस सुनील रंगारी, अजय शंकर हुके, निलेश निळकंठ भुरकुंडे आणि तेजस सुनील आगे यांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून, जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत पुढील तपास केला जात आहे.





  Print






Related Photos