इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत नीट व जेईई मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन


- आदिवासी विकास विभागाचा पुढाकार : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभणार विनामूल्य मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येथील सेमाना बायपास रोडवरील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत बुधवार ,१९ ऑगस्ट रोजी नीट व जेईई मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले. आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांच्या प्रेरणेतून व नागपूर विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्या नियंत्रणात आदिवासी विकास विभाग व फिजिक्स वाला यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावी विज्ञान शाखेच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता सदर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये दोन वर्ष जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन लाभणार आहे. यासाठी आतापर्यंत ६४ आदिवासी विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे.
उद्घाटन सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कार्यालयीन अधीक्षक वासुदेव उसेंडी, मुख्याध्यापिका वंदना महल्ले , फिजिक्स वाला टीमचे एसआयपी हेड विजयकुमार, अकॅडमिक ऑपरेशन मॅनेजर अमित राज , फॅकल्टी कॉर्डिनेटर जितेंद्र झा ,फिजिक्स वाला तज्ञ मार्गदर्शक अमृत कुमार,प्रवीण एकाडे, सतीश जाधव ,अकरावीचे वर्गशिक्षक नितीन साठवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालयात तसेच आयआयटी, एनआयटी मध्ये प्रवेश घेणे सोयीचे व शक्य व्हावे यासाठी हा उपक्रम आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे.यावेळी विद्यार्थ्यांना संबंधित विषय पुस्तकांचे वितरण करण्यात आले.नीट व जेईई वर्ग खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षांबद्दल उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन केंद्रात जिल्ह्यातील गडचिरोली,अहेरी व भामरागड प्रकल्पातील ६४ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत, यामध्ये नीट करिता १० मुले व २९ मुली असे एकूण ३९ विद्यार्थी तर जेईई साठी १३ मुले व १२ मुली अशा एकूण २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे संचालन नमन धरणे व निखिता परधान यांनी केले. अंतरा कन्नाके या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक डी.जी. चोपडे, अधिक्षिका निमा राठोड, शिक्षक जी. टी. डोंगरवार ,डी. डी. धोंगडे, ए. बी. बलगुजर, एन. व्ही. कळंब , बी. के. वाघमारे, बी. के.खोब्रागडे ,ए. डी. नंदनवार, पी.डी. बानाईत, व्ही. आर. वाढे , टी. डब्लू. ठावरी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




Petrol Price




