राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेत चंद्रपूर जिल्ह्याची १०० टक्के उद्दिष्टपूर्ती


- जिल्ह्यातील ४ लाख ११ हजारांहून अधिक बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ योग्य प्रकारे व्हावी तसेच जंताच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांना प्रतिबंध घालता यावा, या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन आणि दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप-अप दिवसाचे आयोजन करून जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. या मोहिमेत निर्धारित उद्दिष्टाच्या १०० टक्के पूर्ततेसह एकूण ४ लाख ११ हजार ४०३ जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य विभागामार्फत या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात आली.राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेअंतर्गत १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंताच्या संसर्गापासून संरक्षण मिळावे, त्यांच्यातील रक्तक्षय व कुपोषणासारख्या समस्यांना प्रतिबंध करण्यास मदत व्हावी आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, हा प्रमुख उद्देश ठेवण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय व खासगी शाळा, अंगणवाडी केंद्रे, आश्रमशाळा तसेच अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भाग मिळून या मोहिमेचे एकूण उद्दिष्ट ४ लाख ८ हजार ४८२ इतके निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्ष मोहिमेदरम्यान एकूण ४ लाख ११ हजार ४०३ जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत १०० टक्क्यांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून मोहिमेची उद्दिष्टपूर्ती करण्यात आली.मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात दिनांक २७ ऑक्टोबर रोजी शाळा, अंगणवाडी केंद्रे व आश्रमशाळांच्या माध्यमातून जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. या दिवशी गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या मुला-मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी दिनांक ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिवसाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून उर्वरित लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचा लाभ देण्यावर विशेष भर देण्यात आला.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी समन्वयाने काम केले. विविध विभागांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त बालकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले, असे जि. प. आरोग्य विभागाने कळविले आहे.




Petrol Price




