वरोऱ्यात पिस्तूल व जिवंत काडतुसांसह आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत अवैधरीत्या पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने अटक केली. ही कारवाई १७ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार वरोरा विभागात पेट्रोलिंग तसेच अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी सत्यम टॉकीजच्या मागील वड्डार वस्ती परिसरात राहणारा संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असून, त्याने घरात अवैध अग्निशस्त्र बाळगल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
माहितीच्या आधारे पथकाने लभाने याच्या घरावर छापा टाकला. घरझडतीदरम्यान एक पिस्तूल, दोन मॅग्झीन आणि १० जिवंत काडतुसे आढळून आली. यासोबत आरोपीचा मोबाईल असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ९०२/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार, पोहवा नितीन कुरेकर, सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, रजनीकांता पुठ्ठावार, जयसिंग, प्रमोद कोटनाके, पोलीस शिपाई अमोल सावे, विठ्ठल काकडे, प्रफुल्ल पुप्पलवार, प्रतीक हेमके, अजित शेंडे, सुमित बरडे तसेच चालक पोहवा दिनेश अराडे, मिलिंद टेकाम आणि गजानन मडावी यांनी केले.




Petrol Price




