महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्री-व्होटर म्हणून नोंदणी करा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांनी १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी भावी मतदार प्रि-व्होटर म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक तसेच शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनल कळसकर, उपजिल्हाधिकारी हेमा बढे, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे तसेच निवडणूकविषयक अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयातील १७, १८ व १९ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी भावी मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी फॉर्म भरावा. त्यामध्ये नमूना क्रमांक ६ कसा भरावा, यांचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यात सर्वांना व्होटर हेल्पलाईन अँप डाऊनलोड करण्यास सांगितले व त्या अँपमध्ये माहिती कशी भरावी याचेही प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. असे प्रात्यक्षिक महाविद्यालयात व्हिडीओ कॉन्सफरन्सद्वारे घेऊन विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला लावण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले. शिक्षक मतदार संघ, मतदार नोंदणी करण्यासाठी पात्रता काय आहेत, याचेही मार्गदर्शन करण्यात आले. अर्जदार हा नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील सर्व साधारण रहिवासी असावा. १ नोव्हेंबर पूर्वीच्या लगतच्या ६ वर्षापैकी ३ वर्ष माध्यमिक स्तर किंवा त्यावरील शिक्षण संस्थेत शिकविण्यासाठी कार्यरत असणे आवश्यक आहे. नमून १९ सोबत लगतचे १ नोव्हेंबरपासून पूर्वीचे ६ वर्षामध्ये ३ वर्ष सेवा कालावधी असून एखादा शिक्षक सेवानिवृत्त झालेला असेल तरीही ते आपल्या नावाची नोंदणी करु शकतात, असे सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Nagpur