जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर

काळा दिवस पाळत जोरदार घोषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले. १ नोव्हेंबर २००५ पासून जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय लागू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि जुनी पेन्शन संघर्ष कृती समन्वय समितीच्या वतीने शनिवारी (३१ ऑक्टोबर) चंद्रपुरात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रतीकात्मक काळा दिवस पाळत गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
३१ ऑक्टोबर २००५ चा काळा शासन निर्णय रद्द करून १९८२/८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात गेल्या ११ वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून चंद्रपुरात विविध शासकीय विभागांतील हजारो कर्मचारी काळ्या फिती लावून मोर्चात सहभागी झाले होते. हातात पेन्शनच्या हक्काचे फलक घेऊन तसेच शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कर्मचाऱ्यांनी शहराचे लक्ष वेधले.
गांधी चौकातून सुरू झालेल्या मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाली. यावेळी आयोजित सभेत विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विपिन धाबेकर, जिल्हा महासचिव लखन साखरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अनिल डहाके, नुटाचे डॉ. प्रवीण जोगी, गोंडवाना विद्यापीठ टीचर्स असोसिएशनचे डॉ. प्रमोद शंभरकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुनील शेरकी, मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे चानकुमार खोब्रागडे, विस्तार अधिकारी संघटनेचे विशाल बोधाने, दुशांत निमकर, निलेश कुमरे, डॉ. गुलाब लाडे आणि प्रशांत खुसपुरे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या सन्मानपूर्वक जीवनाचा हक्क आहे. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. हा हक्क मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.




Petrol Price




