सोनसरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी रानू हलामीच्या कुटुंबीयांची आदिवासी विकास मंत्र्यांकडून सांत्वन भेट


- मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकभावना; हलामी कुटुंबीयांना दिला धीर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या रानू कृष्णा हलामी या विद्यार्थिनीच्या दुर्दैवी निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका निरागस बालिकेचे अकाली निधन झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासमवेत मान्यवरांनी रानूच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
या सांत्वन भेटीदरम्यान मंत्री डॉ. अशोक उईके आणि उपस्थित मान्यवरांनी हलामी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांचे दुःख जाणून घेतले. आपल्या लाडक्या मुलीला गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य असून, अशा कठीण प्रसंगी कुटुंबीयांना मानसिक आधार देणे महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी शोकाकुल कुटुंबीयांना धीर देत या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांना बळ मिळावे, अशी प्रार्थना केली.
रानूच्या निधनामुळे तिच्या कुटुंबीयांसह परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. बालवयातच एका विद्यार्थिनीचा जीवनप्रवास संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, या घटनेने परिसरातील नागरिकही व्यथित झाले आहेत.
या वेळी माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार डॉ. नामदेवरावजी उसेंडी, भाजपचे कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेवजी फाये, पोलीस अधीक्षक एम. अरुण, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी एम. अरुण तसेच विविध प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
रानू कृष्णा हलामी हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत उपस्थितांनी हलामी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.




Petrol Price




