जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते महा रेशीम अभियानाचा शुभारंभ
- महारेशीम अभियान अंतर्गत तुती लागवड कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महारेशीम अभियाना दरम्यान शेतकऱ्यांनी तुती लागवड करीता आपल्या नावाची नोंदणी करुन पारंपारीक शेतीसोबत एक पुरक व्यवसाय म्हणुन तुती लागवड करुन रेशीम शेती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महारेशीम अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
शेतकऱ्यांनी पारंपारीक शेती बरोबरच शेतीसाठी एक उत्तम पुरक व्यवसाचा पर्याय म्हणुन रेशीम शेती बाबज जनजागृती व्हावी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना गावागावांमधून रेशीम शेतीचे महत्व पटवून सांगण्यासाठी रेशीम विकास विभागाच्यावतीने १५ डिसेंबर पर्यंत महारेशीम अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या महारेशीम अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
अभियानादरम्यान शेतकऱ्यांना गावा गावामधून रेशीम शेतीचे महत्व पटवून देणे आणि इतर पिकांच्या तुलनेत मिळणारा भरघोस नफा याचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. रेशीम कोषांना मिळणारे भाव लक्षात घेता व इतर पिकांच्या भावामधील चढउतार पाहता शेतकऱ्यांनी रेशीम शेतीबाबत माहिती करुन घ्यावी व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करुन रेशीम कोषांचे पीक घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रति एकर ३ लाख ४२ हजार ९०० रुपये तीन वर्षासाठी तुती लागवड व किटक संगोपन बांधकामाकरीता लाभ देण्यात येते. कृषि विभागाच्या पोकरा योजनेंतर्गत तुती लागवड, किटक संगोपन बांधकाम, किटक संगोपन साहित्यासाठी सर्वसाधारण लाभार्थ्यांना ७५ टक्के तर अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येते. ज्या लाभार्थ्यांना मनरेगा व पोकरा या दोन्ही योजनेचा लाभ घेता येत नाही, अशा सर्व लाभार्थ्यांकरीता केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-२ योजनेअंतर्गत दोन एकर रेशीम शेतीसाठी अंदाजपत्रकीय रक्कम ७ लाख ५० हजार रुपयामधुन सर्वसाधारण लाभार्थ्यांना ७५ टक्के तर अनुसुचित जाती/अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांकरीता ९० टक्के अनुदान देण्यात येते.
शेतकऱ्यांना रेशीमची परीपूर्ण माहिती नसल्याने या शेती उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळल्याचे दिसून येत नाही. मनरेगा, पोकरा, केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र योजना अंतर्गत तुती रेशीम उद्योगात महिलांचा सहभाग वाढविणे, तुती वृक्षाची लागवड करुन पर्यावरणाचा संतुलन राखणे व उत्पादनात वाढ करणे तसेच रेशीम तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरीता जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.
News - Wardha