महत्वाच्या बातम्या

 सण-उत्सव आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात मनाई आदेश लागू


२७ ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : आगामी नवरात्रोत्सव, विजयादशमी (दसरा), रावण दहन कार्यक्रम तसेच विविध संघटनांकडून आयोजित करण्यात येणारे मोर्चे, धरणे व आंदोलने यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. अप्पर जिल्हादंडाधिकारी मनोहर चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.

हा आदेश १३ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजेपासून ते २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण भंडारा जिल्ह्यात लागू राहणार आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.

सण-उत्सव आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निर्णय -
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुका, घटस्थापनेनिमित्त मोहाडी येथील कोरभी देवी मंदिर, शीतला माता मंदिर व चौडेश्वरी माता मंदिर परिसरात होणारी गर्दी, तसेच दसरा आणि विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणारे रावण दहन कार्यक्रम यांमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येण्याची शक्यता आहे.

याशिवाय धान बोनस, भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करणे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देणे, जनगणना २०२६ मध्ये स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश, गोसेखुर्द प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, रासायनिक औषधांचा पुरवठा, महागाई आणि ओबीसी आरक्षण आदी मागण्यांसाठी राजकीय नेते, शेतकरी, मजूर व विविध संघटनांकडून मोर्चे, निदर्शने आणि आंदोलने आयोजित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक, भंडारा यांच्या शिफारशीनुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

या बाबींवर राहणार निर्बंध -
आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, लाठ्या-काठ्या किंवा शारीरिक दुखापत होऊ शकेल अशा वस्तू जवळ बाळगणे, दाहक अथवा स्फोटक पदार्थ सोबत नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे गोळा करणे अथवा ती फेकण्यासाठी साधने तयार करणे यावर बंदी राहील.

 तसेच व्यक्ती, प्रेते किंवा प्रतिमा-पुतळ्यांचे जाहीर प्रदर्शन करणे, प्रक्षोभक घोषणा देणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे, सभ्यता, नीतिमत्ता अथवा राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशी भाषणे, हावभाव किंवा सोंग करणे आणि अशा आशयाची चित्रे अथवा फलक प्रदर्शित करण्यास मनाई राहील.

शासकीय कर्मचारी व काही कार्यक्रमांना सूट -
कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. अंत्ययात्रा, प्रेतयात्रा, विवाह सोहळे तसेच धार्मिक कार्यक्रम व यात्रांमधील मिरवणुकांनाही आदेशातून सूट देण्यात आली आहे. विशेष धार्मिक मिरवणुका किंवा कार्यक्रमांना परवानगी देण्याचे अधिकार संबंधित क्षेत्रातील उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos