महत्वाच्या बातम्या

 वाघाच्या दहशतीत झाडावर काढली अख्खी रात्र : १२ तास मृत्यूशी झुंज देत युवक सुखरूप परतला!


- एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली येथील थरारक घटना; पहाटे वाघ निघून गेल्यानंतर उतरला झाडावरून

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : समोर वाघ, खाली मृत्यूची भीती आणि जीव वाचविण्यासाठी एकमेव आधार असलेले झाड! अशा भयावह परिस्थितीत एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली येथील २३ वर्षीय युवकाने तब्बल १२ तास झाडावर बसून मृत्यूशी झुंज दिली. शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास समोर आलेल्या वाघापासून बचाव करण्यासाठी झाडावर चढलेल्या या युवकाने संपूर्ण रात्र झाडावरच काढली. रविवारी पहाटे वाघ निघून गेल्यानंतर तो सुखरूप गावात परतला. महेंद्र भाऊजी दुर्वा असे या युवकाचे नाव असून, त्याच्या या थरारक अनुभवाने परिसरात खळबळ उडाली आहे.

गुरे चारताना अचानक समोर आला वाघ -
मरपल्ली येथील महेंद्र दुर्वा हा शनिवारी गावातील काही महिलांसोबत शेतालगतच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेला होता. दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक त्याच्या समोर वाघ आला. अचानक वाघ दिसल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महेंद्रने क्षणाचाही विलंब न करता जवळच्या झाडावर चढून स्वतःचा जीव वाचविला. दरम्यान, सोबत असलेल्या महिलांनी त्याला आवाज देऊन खाली येण्यास सांगितले. मात्र, समोरच वाघ असल्याने महेंद्र प्रचंड भयभीत झाला होता. वाघाच्या भीतीमुळे त्याने महिलांच्या हाकांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर महिला गावाकडे परतल्या. मात्र, महेंद्र गावात परतला नसल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांची चिंता वाढली.

रात्रभर झाडावरच; ग्रामस्थांकडून शोधमोहीम -
महेंद्र घरी न परतल्याने ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने शोधमोहीम अधिकच आव्हानात्मक बनली होती. रविवारी पहाटे सुमारे ८५ ग्रामस्थ जंगलात त्याचा शोध घेण्यासाठी गेले. दुसरीकडे, महेंद्र मात्र संपूर्ण रात्र झाडावर बसून होता. त्याच्या म्हणण्यानुसार, पहाटे ४ वाजताच्या सुमारास वाघ तेथून निघून गेला. त्यानंतर महेंद्र झाडावरून खाली उतरला आणि जवेलीमार्गे रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सुखरूप गावात पोहोचला. तब्बल १२ तास मृत्यूच्या छायेत घालवल्यानंतर तो परतल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मी १२ तास मृत्यूच्या दारात होतो -
या थरारक अनुभवाबाबत महेंद्र दुर्वा याने सांगितले की, वाघ दिसताच त्याने धैर्य न गमावता झाडावर चढण्याचा निर्णय घेतला. दुपारी ४ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत वाघाची नजर आपल्यावर असल्याचे त्याने सांगितले.

मी अक्षरशः मृत्यूच्या दारात होतो. सोबत असलेल्या महिलांचे आवाज ऐकू येत होते; मात्र वाघ समोर असल्याने भीतीपोटी मी काहीच बोललो नाही. रात्रभर झाडावर बसून राहिलो. पहाटे वाघ निघून गेल्यानंतरच झाडावरून खाली उतरलो, अशा शब्दांत महेंद्रने आपली आपबिती कथन केली.

वाघाचा बंदोबस्त करण्याची काँग्रेसची मागणी -
या घटनेनंतर परिसरातील वाघाच्या वाढत्या वावराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आलापल्ली वनविभागांतर्गत पेरमिली वनपरिक्षेत्रातील या भागात वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी, गुराखी आणि जंगलालगतच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पत्रपरिषद घेऊन वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. वाघाच्या वावरामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याने वनविभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षितता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेसचे प्रज्ज्वल नागुलवार यांनी वाघाचा तत्काळ बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शेतकरी आणि गुराख्यांमध्ये चिंतेचे वातावरण -
गडचिरोली जिल्ह्यातील जंगलालगतच्या गावांमध्ये शेतकरी आणि गुराख्यांना शेतीकामासाठी तसेच जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात जावे लागते. अशा वेळी वाघाचा सामना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महेंद्र दुर्वा याचा जीव वाचला असला, तरी या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.





  Print






Related Photos