गडचिरोलीत पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के


- सिरोंचा तालुक्यात ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद; अहेरी, नागेपल्ली परिसरातही जाणवले हादरे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांनी ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले असून, भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले. अचानक जाणवलेल्या हादऱ्यांमुळे सिरोंचा परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सिरोंचा तालुक्यासह लगतच्या अहेरी तालुक्यातील अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटेची वेळ असल्याने बहुतांश नागरिक घरात झोपेत होते. अचानक घरातील वस्तू, दरवाजे-खिडक्या हलू लागल्याने अनेकांना भूकंपाची जाणीव झाली. काही नागरिकांनी खबरदारी म्हणून तातडीने घराबाहेर धाव घेतली.
भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने मोठ्या स्वरूपाची हानी झाली नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपानंतर संबंधित भागातील परिस्थितीचा प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला. प्राथमिक पाहणीत कुठेही मोठ्या स्वरूपाचे नुकसान झाल्याचे आढळून आले नसल्याची माहिती आहे.
प्रशासनाकडून तातडीने पाहणी -
भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्क केले. सिरोंचा, अहेरी तसेच परिसरातील गावांमध्ये परिस्थितीची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली. महसूल प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांकडून संभाव्य नुकसानीची पाहणी करण्यात आली.भूकंपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, तसेच कोणत्याही अफवांना बळी पडू नये, यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कुठेही मोठी हानी झाल्याची नोंद नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन -
भूकंपाच्या घटनेनंतर सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अपुऱ्या अथवा चुकीच्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. घाबरून न जाता संयम राखावा आणि आवश्यक ती दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.जिल्हा प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि भूकंपासंदर्भातील माहिती केवळ अधिकृत स्रोतांकडूनच घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




Petrol Price




